व्यायाम करण्याचा कंटाळा येत आहे का ? मग हे करा !
सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(भाग १०)
‘आपण अनेकदा व्यायाम करण्यासाठी आदर्श नियोजन करतो; पण ते वास्तविकतेत कधीच उतरत नाही. तुमची क्षमता, तुमच्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि सवयी या सर्वांचा विचार करून व्यायामाचे नियोजन करा, उदा. एखाद्याला प्रतिदिन सकाळी लवकर उठण्याची सवय नसते; पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते; म्हणून तो तसे करायचे ठरवतो; पण प्रत्यक्षात त्याला लवकर उठणे जमत नाही आणि त्याचा व्यायामही होत नाही. अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना जेव्हा ऊर्जा आणि वेळ उपलब्ध असेल, तेव्हा संध्याकाळी किंवा रात्री व्यायाम करण्याचे नियोजन करावे. त्यामुळे व्यायाम नियमित होईल. हळूहळू झोपेच्या वेळा सुधारल्यावर सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करत व्यायामाचे नियोजन करता येईल. परिस्थितीला ओळखून व्यायामाचे ध्येय ठरवल्यास निराशा टाळता येईल. त्यामुळे आरंभीच आणि प्रत्येक वेळी आदर्श नियोजन न करता तुमची सवय, स्थिती आणि वेळ यांनुसार टप्प्याटप्प्याने आदर्शाकडे वाटचाल करा अन् व्यायामात सातत्य ठेवा !’
– श्री. निमिष त्रिभुवन म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (८.९.२०२४)
या लेखाच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/835619.html