नवी मुंबई, १५ सप्टेंबर (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झाडांवरती विद्युत् रोषणाई करण्यास प्रतिबंध घातलेला असतांनाही हे बंदी आदेश धुडकावत शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे. (कायद्याचा धाक नसलेली जनता ! – संपादक) या मंडळावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी संबंधित विभाग अधिकार्यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.
झाडांवर केलेली दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील किटक यांसाठी धोकादायक ठरत असल्याचा पर्यावरण तज्ञांचा दावा आहे. या कारणास्तव मागील वर्षी उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेची गंभीर नोंद घेत राज्य सरकारला नोटीस बजावली होती; मात्र तरीही नवी मुंबईतील उपाहारगृहे आणि अन्य व्यावसायिक यांनी त्यांच्या दुकानांसमोरील झाडांवर विद्युत् रोषणाई केली होती. याविषयी वृत्त दिल्यानंतर प्रशासनाने झाडांवर विद्युत् रोषणाई आणि विज्ञापने करणार्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. अद्यापपर्यंत ४ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी गणेशोत्सवापूर्वीच झाडांवर लावलेल्या जाहिराती, पोस्टर्स, भित्तीपत्रके तसेच करण्यात आलेली विद्युत् रोषणाई ७ दिवसांच्या आत न काढल्यास गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी जाहीर सूचना दिली होती. असे असतांनाही अनेक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेच्या या आव्हानाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामध्ये सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, दिघा या विभाग कार्यालय क्षेत्रातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत् रोषणाई आणि झाडांवर विज्ञापनेही लावली आहेत. गणेशोत्सव संपत येऊनही अधिकार्यांकडून मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे ‘शहरातील करदात्या व्यावसायिकांना एक नियम आणि अन्य लोकांना वेगळा नियम अशी भूमिका प्रशासनाकडून अवलंबण्यात येत आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.