श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला आणि किश्तवाड येथे आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले, तर २ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि सैनिक अरविंद सिंह अशी वीरमरण आलेल्या सैनिकाची नावे आहेत.
काश्मीरमधील डोडा येथे होणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभेपूर्वी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक चालू आहे.
१. बारामुल्ला आणि किश्तवाड येथे लपून बसलेल्या आतंकवाद्यांना पकडण्यासाठी सैन्यदल आणि पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.
२. बारामुल्लाच्या टापर भागात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. किश्तवाडच्या नैदघम गावात १३ सप्टेंबरला चकमक झाली. येथे जैश-ए-महंमदचे ३ आतंकवादी असल्याची गुप्तचर माहिती सैन्यदलाला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर सैन्याकडून कारवाई करण्यात आली.
३. यापूर्वी कठुआमध्ये २ आतंकवादी मारले गेले होते. त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ११ सप्टेंबर या दिवशी उधमपूरमध्येही ३ आतंकवादी मारले गेले होते.