देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ यांसंदर्भातील संशोधन !

यज्ञयाग आणि पूजन यांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात १६.३.२०२४ या दिवशी ‘दशदिक्पाल पूजन’ आणि १७.३.२०२४ या दिवशी भगवान शिवाचे गुरुरूप असलेल्या श्री दक्षिणामूर्ती या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ती याग’ करण्यात आले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांचे रक्षण व्हावे’, या उद्देशांनी हे यागविधी करण्यात आले. ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती याग’ यांसंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन पुढे दिले आहे.

 

श्री दक्षिणामूर्ती

‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती याग’ यांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा यागातील घटक आणि तेथील वातावरण यांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.

१. चाचणीतील नोंदींचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

पहिल्या दिवशी (१६.३.२०२४ या दिवशी) पूजेतील कलश, महर्षींचे चित्र, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र आणि पुरोहित या सर्वांची विधीपूर्वी अन् विधीनंतर छायाचित्रे काढण्यात आली.

दुसर्‍या दिवशी (१७.३.२०२४ या दिवशी) यागातील पूजेची मांडणी, पूजेतील कलश, श्री दक्षिणामूर्ती देवतेचे चित्र, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र, यज्ञस्थळीची माती, पाणी आणि वायू यांचे नमुने, तसेच यागाचे पुरोहित या सर्वांची यागापूर्वी अन् यागानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ. दशदिक्पाल पूजनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा पूजेतील घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : पूजनानंतर पुरोहितातील नकारात्मक ऊर्जा अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. अन्य घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढली. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.

१ आ. मेधा-दक्षिणामूर्ती यागातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा यागातील घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : यागानंतर घटकांतील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.

२. चाचणीतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

अ. पुरोहितांनी दशदिक्पाल पूजन आणि मेधा-दक्षिणामूर्ती याग यांतील विधी भावपूर्ण केले. त्यामुळे पूजेतील कलश, महर्षींचे चित्र, पूजेतील दक्षिणामूर्ती देवतेचे चित्र आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र यांच्यातील चैतन्य कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित झाले. यामुळे त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. यातून यज्ञयाग भावपूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात येते.

आ. पुरोहितांनी त्यांच्या भावानुसार दशदिक्पाल पूजन आणि मेधा-दक्षिणामूर्ती याग यांतील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ अल्प होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

इ. यागातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम तेथील वातावरणावर झाला. त्यामुळे तेथील माती, पाणी आणि वायूमंडल यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे किंवा तिच्यात वाढ झाल्याचे दिसून आले. यातून ‘यज्ञयागामुळे वातावरणाची शुद्धी होऊन ते चैतन्यमय बनते’, हे लक्षात येते.

३. सप्तर्षींच्या आज्ञेने समष्टी-कल्याणार्थ सनातनच्या आश्रमात करण्यात येणार्‍या यज्ञयागांचे महत्त्व जाणा !

सप्तर्षींच्या आज्ञेने केलेले पूजाविधी आणि यज्ञयाग यांमागे त्यांचा संकल्प अन् आशीर्वाद कार्यरत असतात. हे यज्ञयाग सात्त्विक ठिकाणी आणि समष्टीच्या कल्याणार्थ केले जातात. यज्ञयागांशी संबंधित सर्व सिद्धता (तयारी) साधक सेवाभावाने करतात. या यज्ञयागांना सनातनचे संत आणि सद्गुरु यांची वंदनीय उपस्थिती लाभते. सनातनचे पुरोहित यज्ञयाग भावपूर्ण करतात. यामुळे या यज्ञयागांची फलनिष्पत्ती उत्तम मिळते, तसेच ते करण्यामागील उद्देशही सफल होतो, हेच या संशोधनातून दिसून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.७.२०२४)

इ-मेल : [email protected]