पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
लेखांक क्र. ४५ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830897.html
(लेखांक ४६)
७. स्कन्दपुराणातील गोमाहात्म्य !
त्वं माता सर्वदेवानां त्वं च यज्ञस्य कारणम् ।
त्वं तीर्थं सर्वतीर्थानां नमस्तेऽस्तु सदानघे ।।
– स्कन्दपुराण, ब्राह्मखण्ड, अध्याय १०, श्लोक १८
अर्थ : हे निष्पाप असणार्या गोमाते, तू सर्व देवांची आई, सर्व यज्ञांचे कारण आणि सर्व तीर्थांचेही तीर्थस्थान आहेस. तुला माझा सदैव नमस्कार असो.
८. गायीच्या शरिरात सर्व देवतांचे वास्तव्य !
पृष्ठे ब्रह्मा गले विष्णुर्मुखे रुद्रः प्रतिष्ठितः ।
मध्ये देवगणाः सर्वे रोमकूपे महर्षयः ।
नागाः पुच्छे खुराग्रेषु ये चाष्टौकुलपर्वताः ।
मूत्रे गङ्गादयो नद्यः नेत्रयोः शशिभास्करौ ।
येन यस्याः स्तनौ वेदाः सा धेनुर्वरदास्तु मे ।।
अर्थ : जिच्या पाठीवर ब्रह्मा, कंठात विष्णु आणि मुखात शिव, शरिरामध्ये सर्व देवता, रोमारोमांत (शरिरावरील केसांत) महर्षि, शेपटीत नाग, खुरांच्या ठिकाणी ८ कुलपर्वत, मूत्रात गंगा आदी नद्या, डोळ्यांत चंद्र-सूर्य आणि स्तनांच्या ठिकाणी ४ वेद आहेत, ती गोमाता मला वरदायिनी होवो !
९. शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व !
गवां सेवा तु कर्तव्या गृहस्थैः पुण्यलिप्सुभिः ।
गवां सेवापरो यस्तु तस्य श्रीर्वर्धतेऽचिरात् ।।
अर्थ : पुण्याची इच्छा करणार्या गृहस्थांनी गोसेवा केली पाहिजे. जो गोसेवेत मग्न असतो, त्याचे वैभव शीघ्र गतीने वाढते.
यद् गृहे दुःखिता गावः स याति नरकं नरः ।
अर्थ : ज्या घरात गाय दुःखी असते, तो पुरुष नरकात जातो.
अशी असंख्य वचने संस्कृत साहित्य आणि धर्मग्रंथ यांत पदोपदी आढळतात.
१०. गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ !
अ. गीतेतील गोमाहात्म्य !
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।
पार्थाे वत्सः सुधीर्भाेक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।
– श्रीमद्भगवद्गीतामाहात्म्य, श्लोक ६
अर्थ : समस्त उपनिषदे गायीसमान आहेत. त्यांचे दोहन भगवान श्रीकृष्णाने केले आहे. पार्थ अर्जुन वासराप्रमाणे असून त्या वासरावरील प्रेमामुळे पाझरणारे गीतामृतरूपी दुग्ध समस्त विद्वज्जन सेवन करतात.
हे प्रसिद्ध वचन गीतेची महती सांगत आहे. सर्व उपनिषदे ही गाय आहे. दूध दोहणारा गोपालकृष्ण आहे. अर्जुन वासरू आहे आणि ते महान गीतारूपी अमृत गायीचे दूध आहे.
याचा अर्थ असा की, सर्व उपनिषदांचे सार गीता आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून ते उपनिषदांचे सार दोहून काढले आणि उत्तम बुद्धीच्या भोक्त्याला त्याचा लाभ झाला.
आ. मोहनदास गांधी यांची प्रार्थना !
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महीशाः ।
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ।।
अर्थ : प्रजेचे कल्याण होवो, शासनकर्ते न्याय्य मार्गाने पृथ्वीचे परिपालन करोत, गायी आणि ब्राह्मण यांचे नित्य कल्याण होवो अन् सर्व लोक सुखी होवोत. ही पारंपरिक प्रार्थना आहे.
इ. गायीची ऋग्वेदात २१ नावे आली आहेत. त्यात एक आहे ‘अन्घ्या’ आणि बैलाला म्हटले आहे ‘अघ्न्य’, म्हणजे मारू नये, अशी (गाय) आणि बैल (अर्थातच) मारू नये असा.
ई. जैन कवी नरहरीने अकबराच्या राजवाड्यावर गोवधबंदीसाठी गायींचा मोर्चा नेला होता. अकबराने गोवधबंदीचा कायदा केला होता. किंबहुना असे म्हणतात की, बाबरापासून बहादूरशहापर्यंत सर्व मोगल राजांच्या राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा होता.
उ. बौद्ध धर्मातील प्रसिद्ध वचन !
‘गावो नो परमा मित्ता ।’
अर्थ : गायी आमच्या परम मित्र आहेत.
एक अर्थ सरळ आहे, वर्ष १९१६ मध्ये मुस्लीम लीगचे अधिवेशन अमृतसरला भरले होते, तेव्हाचे अध्यक्ष अजमत हुसेन यांनी स्पष्ट केले होते, ‘गोहत्या आम्हाला हवी आहे, असे नाही.’
११. पंचगव्य
वैद्यकीयदृष्ट्या गायीचे महत्त्व पुष्कळ आहे. एखादा संशोधक ‘गो-उपचारपद्धत’ (Cow-therapy) सुद्धा शोधून काढू शकेल. गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे. यालाच ‘पंचगव्य’ असे म्हणतात.
११ अ. दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तू एकत्र करण्याच्या मात्रांचे प्रमाण !
गोमय १ मात्रा + गोमूत्र २ मात्रा + तूप ४ मात्रा + दही ८ मात्रा + दूध १६ मात्रा याप्रमाणे एकत्र करावे. अगदी ताजे प्रतिदिन सकाळी घरातील सर्वांनी स्नानानंतर २-२ चमचे पोटात घ्यावे; मात्र ते निरोगी गायीचे असावे. यामुळे शरीर अगदी निरोगी होते. (क्रमशः)
– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक क्र. ४७ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/831933.html