गोपालन आणि भारतीय राज्यघटना !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राज्यघटनेचे ४८ वे ‘गोवंश हत्याबंदी’चे कलम, ४८ व्या कलमाविषयी सर्वाेच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला निकाल आणि सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आशय’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

लेखांक क्र. ४४ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830596.html

(लेखांक ४५)

४. गोवंशांची सद्यःस्थिती

नवजात वासरे, इतकेच नव्हे, तर पूर्ण दिवस भरत आलेल्या गाभण्या गायींना कापून त्यांची सुकोमल अर्भके तात्काळ कापून टाकून त्यांच्या अत्यंत मुलायम चामड्याला (Calf Leather) जगाच्या बाजारपेठेत सोन्यासारखी किंमत मिळवली जाते.

म्हशींच्या नर-वासरांना सरसकट उपाशी ठेवून मारून टाकण्यात येते; कारण तो काही दुधाच्या कामाचा नाही. तो मोठा होईपर्यंत त्याच्यावर पैसे व्यय करायला हवेत आणि तो म्हशीचे प्रतिदिन काही प्रमाणात दूधही पिऊन ते अल्प करणार. रेड्यांचा उपयोग मोठेपणी शेती किंवा गाडी ओढणे यांसाठी बैलांच्या मानाने अल्पच केला जातो.

यावर काही आधुनिक शहाणी मंडळी म्हणतील, ‘अशा निरुपयोगी, वृद्ध आणि रोगी गायी-बैलांवर उगाचच पैसे व्यय कशाला करायचे ?’

एक गोष्ट लक्षात घ्या, ‘गायी-बैल यांचे नुसते शेण जरी चांगल्या प्रकारे उपयोगात आणले, तरी ते शेणाच्या किंमतीवरही व्यवस्थित पोसले जाऊ शकतात.’

हिंदु संस्कृतीत असणारे गायीचे अनन्यसाधारण महत्त्व !

५. अथर्ववेदातील गोमाहात्म्य !

एतद् वै विश्वरूपं सर्वरूपं गोरूपम् । – अथर्ववेद, काण्ड ९, सूक्त ७, खण्ड २५

अर्थ : हे (व्यापक ब्रह्म) हेच विश्वाचे आणि सर्वांचे रूप देणारे आणि प्राप्त करण्यास योग्य अशा स्वर्गाचे रूप (सुख) देणारे (गोरूप) आहे.

६. ऋग्वेदातील गोमाहात्म्य !

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभिः । – ऋग्वेद, मण्डल ८, सूक्त १०१, ऋचा १५

अर्थ : गाय ही रुद्रगणांची आई, वसूंची कन्या, आदित्याची बहीण आणि अमृताची नाभी म्हणजे केंद्र आहे.

(क्रमशः)

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील श्री. पंढरीपांडे यांनी भाकड गायींपासून बनवलेली उपयुक्त द्रव्ये आणि त्यांची उपयुक्तता !

१. गायीच्या शेण्यांचा जळणासाठी उपयोग करतात.

२. गायीच्या शेणापासून उत्तम खत निर्माण करता येते. शेणात पालापाचोळा, कडबा, कचरा आणि माती मिसळून शेणाच्या २५ पट खत सिद्ध होते, म्हणजेच एका गायीच्या दिवसभराच्या सुमारे १० किलो शेणात २५० किलो उपरोक्त साहित्य मिसळून वर्षाला सुमारे ७५ टन सुके खत प्राप्त होऊ शकते. हे सुमारे ४० एकर भूमीला पुरेसे आहे. या खतामुळे शेती उत्पादन किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढते. कृत्रिम खतांपेक्षा हे सेंद्रिय खत अधिक प्रभावशाली असते.

३. गायीच्या शेणापासून उत्तम साबण सिद्ध करता येतो.

४. शेणाच्या आधारावर धुपाच्या कांड्या सुगंधासाठी बनवता येतात.

५. गायीच्या शेणात काही चिकट द्रव्ये घालून श्री. पंढरीपांडे यांनी घरावरील पत्र्यांना आतून लेप देण्यासाठी एक रंग सिद्ध केला. त्यामुळे तापणार्‍या पत्र्यांचे उष्णतामान २ – ३ अंशांनी न्यून झाले. विदर्भातील उन्हाळ्याच्या दृष्टीने हा रंग पुष्कळ उपयुक्त आहे.

– भारताचार्य अन् धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे