शेवगाव – नि:स्सीम शिवभक्त प्रमिलादेवी वैशंपायन (योगतज्ञ दादाजी यांच्या पत्नी) यांनी तब्बल ४० वर्षे शिवाची कठोर उपासना करून संस्कारित केलेल्या ‘अमलेश्वर’ शिवपिंडीची प्रतिष्ठापना शेवगावच्या श्रीदत्त देवस्थान संचालित योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन ध्यानमंदिरात विधीवत् पूजाविधीने करण्यात आली. नाशिकचे प.पू. श्री गजानन कस्तुरेगुरुजी यांच्या अधिपत्याखाली, तसेच योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरद वैशंपायन आणि सौ. ललिता वैशंपायन यांच्या हस्ते मुख्य शिवपिंड विधी संपन्न झाला. पूजाविधीसाठी ३० स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला.
या निमित्ताने गणपति, भूमी, दीप, शंख आदींचे पूजन करण्यात आले. गणपति अभिषेक, शिवाचे अंगभूत देवतांचे आवाहन आणि पूजन, तसेच शिव आराधना अंतर्भूत रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, नैवेद्य अन् महाआरती झाली. दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुन फडके, सचिव फुलचंद रोकडे, सनातन संस्थेचे साधक श्री. अतुल पवार यांसह हनुमान जोशी, पी.बी. शिंदे, जगन्नाथ गोसावी आदी या वेळी उपस्थित होते. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.