|
उत्तर २४ परगणा (बंगाल) – कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर बीरभूम येथे रुग्णालयात भरती झालेल्या अब्बासउद्दीन नावाच्या रुग्णाने एका परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली. त्यानंतर हावडा येथील रुग्णालयात एका १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. आता उत्तर २४ परगणा येथे ७ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. रोहांडा पंचायतीच्या राजभरी भागात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त लोकांनी आरोपीच्या घरावर आक्रमण केले, तसेच त्याच्या नातेवाइकांची दुकानेही फोडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी दुकानातून परतत असतांना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी हा त्याच गावाचा रहिवासी आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा प्रकरण ‘तडजोडी’ने मिटवण्याचा प्रयत्न !
विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने हे प्रकरण तडजोडीने मिटवण्याचे आवाहन केले. स्थानिक लोकांनी या नेत्याच्या घरालाही लक्ष्य केले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर येथे शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका‘लोकांनी कायदा हातात घेऊ नये’, असे सल्ले दिले जातील; मात्र जनतेला अशी कृती का करावीशी वाटत आहे ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे ! |