जत (जिल्हा सांगली), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – जाडरबोबलाद-मारोळी रस्त्याची अवस्था पानंदरस्त्यासारखी झाली होती. त्यामुळे ९ ऑगस्ट २०२३ या दिवशी सोन्याळ फाटा येथील राज्यमार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले होते. या आंदोलनाची नोंद घेऊन या महिन्यात रस्त्याच्या कामासाठी अर्धवट खडीचे ढीग करण्यात आले. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले. या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर या दिवशी ‘सत्यनारायण महापूजा सोहळा’ रस्त्याच्या मध्यभागी करण्यात येईल, अशी माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, मानवमित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी याविषयी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन दिले आहे.
या वेळी शाहीर रामदास भोसले गोंधळेवाडी, मानव मित्र बाबा आश्रम संख येथील समर्थ राठोड, गोंधळेवाडीचे ऋषी दोरकर, अमोल भोसले, महेश कोडग आदी उपस्थित होते. ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र चालू झाली आहे, तसेच सत्यनारायण महापूजेची पत्रिका सामाजिक माध्यमांतून जत तालुक्यात प्रसारित झाली आहे.
जाडरबोबलाद – मारोळी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याच रस्त्यावरून तपोवन चिखलगी भुयार मठ, व्हस्पेठ येथील श्री बिरोबा देवस्थान, हुलजंती येथील महालिंगराया, सिद्धनकेरी देवस्थान, माचनूर येथील देवस्थान, गुड्डापूर दानम्मा देवी, मुचंडी दर्याबा या सर्व तीर्थक्षेत्रांना ये-जा करण्यासाठी भक्तांना मार्ग आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढलेली होती. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. यापूर्वी आम्ही आंदोलन केल्यानंतर अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेतले; मात्र सद्यःस्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात होत आहेत. या कारणास्तव वरीलप्रमाणे आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे.
– ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज |
संपादकीय भुमिकारस्त्याची कामे होण्यासाठी असे सोहळे राबवण्याची वेळ येणे दुर्दैवी ! प्रशासन स्वतःहून त्यांचे काम का करत नाही ? |