‘१८.७.२०२४ या दिवशी भांडुप (मुंबई) येथील जयेश श्रीकांत राणे (वय ४१ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहारांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. प्रथमेश कुडव, मुंबई
१ अ. मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये विविध विषयांवर पत्रे अन् लेख प्रकाशित होणे : ‘जयेश राणे यांनी २० वर्षांहून अधिक काळ अनेक वृतपत्रांत पत्रलेखन केले आहे. त्यांची दैनिक ‘सनातन प्रभात’, तसेच अन्य वृत्तपत्रांत सहस्रावधी पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. समाजातील पत्रलेखक अनेक वेळा काही विशिष्ट विषयांवर पत्रलेखन करतात; मात्र जयेश राणे सामाजिक, राष्ट्रीय, संरक्षण, भष्ट्राचार, सण-उत्सवांतील अपप्रकार, भारतीय संस्कृती, तसेच राजकीय नेत्यांनी केलेल्या अयोग्य कृती यांवर प्रकाश टाकणारे, अशा विविध विषयांवर पत्रलेखन करत असत. ते नेमकेपणाने आणि मार्मिकतेने विषय प्रस्तुत करत असत. त्यांचे लिखाण मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्येही प्रसिद्ध झाले आहे.
१ आ. वर्ष २०१३ मध्ये ते रुग्णाईत झाल्यावरही त्यांनी पत्रलेखन चालू ठेवले.
त्यांच्या निधनाने समाजाने एक अनुभवी, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म या विषयांवर योग्य विचार देऊन दिशा देणारा पत्रलेखक गमावला आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने जयेशदादांच्या माध्यमातून मला पत्रलेखन आणि वार्ताहर सेवेसंबंधी अनेक सूत्रे शिकायला मिळाली’, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
२. श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई
२ अ. वृत्तपत्रातील लिखाण अयोग्य पद्धतीने प्रकाशित झाल्यास त्याला विरोध करणे : ‘वृत्तपत्र कार्यालयात पाठवलेली पत्रे किंवा लेख काही वृत्तपत्रे कधी कधी अन्य व्यक्तींच्या नावाने प्रसिद्ध करतात किंवा पत्रलेखकाचे नाव नमूद करत नाहीत. अशा वेळी जयेश राणे त्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाला संपर्क करून त्यांची चूक लक्षात आणून देत असत आणि पुन्हा तसे न करण्याविषयी सांगत असत.
२ आ. वृत्तपत्रे कार्यालयाला संपर्क करून पत्रे प्रसिद्ध न होण्यामागील कारणे जाणून घेणे : एखाद्या वृत्तपत्र कार्यालयाला सातत्याने पत्रे पाठवूनही त्या वृत्तपत्रात पत्रे प्रसिद्ध होत नसतील, तर दादा त्यामागील कारणांचा चिकाटीने शोध घेण्याचा प्रयत्न करत असत. त्यासाठी ते संबंधित वृत्तपत्रांच्या उपसंपादकांना संपर्क करत. दादा त्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार्या वाचकांच्या पत्रांचा अभ्यास करून स्वतः लिहिलेल्या पत्रांमध्ये आवश्यक ते पालट करत. दादांनी वृत्तपत्रांमध्ये पत्रे प्रसिद्ध होण्यासाठी घेतलेले कष्ट आणि चिकाटी वाखाणण्याजोगी होती.
२ इ. दादांनी आम्हाला पत्रलेखनाविषयी केलेल्या मार्गदर्शनाचा आम्हाला पुष्कळ लाभ झाला.
३. श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
३ अ. चिकाटीने आहारासंबंधी पथ्ये पाळणे : ‘जयेशदादांना असलेल्या विविध व्याधींमुळे त्यांना जेवणात विविध पथ्ये पाळावी लागत असत. त्यांनी ती पथ्ये चिकाटीने पाळली. ते अन्य ठिकाणी गेले, तरी पथ्याचा आहार समवेत घेऊन जात असत.
३ आ. अभ्यासपूर्ण, सूत्रबद्ध, नेमकेपणाने आणि सर्व दृष्टींनी विचार करून लिखाण करणे : दादांची आकलनक्षमता अतिशय चांगली होती. दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा अन्य वृत्तपत्रे यांसाठी लिखाण करतांना ते वाचकांना विषयाच्या मुळापर्यंत घेऊन जात असत. ते अभ्यासपूर्ण, सूत्रबद्ध, नेमकेपणाने आणि सर्व दृष्टींनी विचार करून लिखाण करत असत. त्यांची लिखाणाची क्षमता, म्हणजे भगवंताने त्यांना दिलेली दैवी देणगी होती.
३ इ. त्यांचे लिखाण भावनिक स्तरावर नसून वैचारिक स्तरावर असे.
३ ई. गुरूंप्रती भाव : दादांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा होती. ते सनातन संस्थेच्या माध्यमातून सांगितलेले नामजपादी उपाय आणि प्रार्थना चिकाटीने करत असत. त्याविषयी काही शंका असल्यास ते विचारून घेत असत.
३ उ. कृतज्ञता : ‘गुरुदेवांनी जयेश राणे यांच्यासारख्या साधकाच्या माध्यमातून आम्हाला लिखाणातील बारकावे सुचवले. त्यातून केवळ मुंबईतील नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतील साधकांना पत्रलेखनाची कला अवगत झाली’, त्याबद्दल गुरुदेव आणि भगवंत यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे. जयेश राणे यांनी केलेल्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’चे सर्व वार्ताहरसेवक कृतज्ञ आहोत.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.७.२०२४)