लेह (लडाख) – लडाखला लागून असलेल्या चीनसमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भारतीय सीमेमध्ये घुसलेले ४० चिनी याक प्राण्यांना भारताने पुन्हा चीनमध्ये पाठवले. त्याच वेळी या याकांच्या मालकांना ‘हे प्राणी भारताच्या सीमेमध्ये येता कामा नये’, अशी चेतावणीही दिली.
चीन भारतीय प्राण्यांना परत करत नाही !
चुशुलचे नगरसेवक कोन्चोक तेन्झिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, काही दिवसांपूर्वीच ४० चिनी याक पूर्व लडाखच्या डेमचोक भागात आले होते. जेव्हा भारतीय प्राणी चीनच्या सीमेमध्ये जातात, तेव्हा ते पुन्हा भारताला पाठवले जात नाहीत; मात्र भारताने चीनला त्याचे याक परत केले आहेत.
चीन अनेकदा या सीमेवर त्याचा दावा करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. लडाखमध्ये गायरान क्षेत्रावरून सातत्याने वाद होत आहेत. हे क्षेत्र भारताच्या आदिवासी समुदायांसाठी महत्त्वाचे आहे; कारण त्यांनी शतकानुशतके तेथे त्यांची जनावरे चरण्यासाठी आणतात.
सीमेवर चरणार्या प्राण्यांची संख्या ५८ सहस्र !
वर्ष २०२० मध्ये येथील सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या भागात चरणार्या प्राण्यांची संख्या वर्ष २०१९ मध्ये ५६ सहस्र होती. वर्ष २०२१ मध्ये २८ सहस्रांवर आली; मात्र आता ती पुन्हा वाढून अनुमाने ५८ सहस्र इतकी झाली आहे.
संपादकीय भूमिकाकालपर्यंत चीनचे सैनिक घुसखोरी करत होते आणि आता ते प्राण्यांना घुसखोरी करण्यासाठी पाठवत आहेत. भारत अशा प्रकारच्या डावपेचात कधी हुशार होणार ? |