प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आयात होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवा ! – आमदार विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड

पणजी – राज्याबाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती गोव्यात येऊ नयेत, यासाठी सरकारने याकडे लक्ष ठेवावे. राज्याबाहेरून येणार्‍या श्री गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत कि नाहीत ? हे शोधून काढण्यासाठी मूर्तींचा उत्पादक कोण ? त्या कोठून आल्या ? पुरवठादार कोण ? वाहतूक करणार्‍या वाहनाचा क्रमांक आदी सर्व माहितींची नोंद ठेवावी. पुढे या माहितीच्या आधारावर संबंधितांवर कारवाई करणे शक्य होणार आहे, अशी मागणी ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
आमदार विजय सरदेसाई पत्रात म्हणतात, ‘‘पर्यावरणासाठी हानीकारक ठरणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीं गाेव्यात आयात होऊ नयेत, यासाठी राज्याच्या सीमेवर देखरेख केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे; परंतु सरकारने अजूनही काही कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पर्यावरणासाठी हानीकारक आहेत. या मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यात विरघळत नाहीत आणि यामुळे त्या विसर्जनानंतर किनार्‍यावर वाहून येतात. यासाठी सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे.

आमदार विजय सरदेसाई पुढे म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीविषयी तक्रार नोंद करण्यासाठी सरकारने ‘हेल्पलाईन’ चालू करावी. चिकण मातीपासून बनवलेल्या मूर्तींना ‘क्युआर् कोड’ लावणे आदी ठोस उपाययोजना कराव्यात.’’

राज्यातही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीची निर्मिती !

गोव्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीवर बंदी आहे; परंतु अनेक ठिकाणी दुकानात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. धारबांदोडा तालुक्यातील काही गावांमध्ये, तसेच फोंडा तालुक्यातील बोरी, शिरोडा, मडकई या भागांतील काही मूर्तीकारांनी मूर्तीशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मातीच्याच श्री गणेशमूर्ती बनवून विक्री करणार्‍या काही मूर्तीकारांनी सांगितले की, प्रतिवर्षी गोवा हस्तकला महामंडळाचे अधिकारी मूर्तीशाळेतील मूर्ती पडताळायला येतात. किती मूर्ती बनवणार ? आणि किती मूर्तीवर अनुदान घेणार ? त्याची संख्या नोंद करून त्याप्रमाणे महामंडळाकडून अनुदान दिले जाते. गेल्या वर्षीचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नसल्याचे काहींनी सांगितले. जे मूर्तीकार मूर्तीशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती ठेवतात, ते मूर्तीकार मातीच्या मूर्तीबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरही हस्तकला महामंडळाकडून अनुदान घेतात. पारंपरिक पद्धतीने मातीच्या मूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांचे म्हणणे आहे की, मातीची एक मूर्ती बनवायला अंदाजे ४ घंटे लागतात, तर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अर्ध्या घंट्यांत बनवून होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर मूर्तीकारांनी हस्तकला महामंडळाकडून अनुदान घेणे हा अन्याय आहे. देवाकडेही हे लोक फसवणूक करतात. याची चौकशी व्हायला हवी. या विषयी गोवा हस्तकला महामंडळाकडे २२२८१५७ आणि २९९५३२८ क्रमांकांवर संपर्क केल्यावर एका महिलेने दूरभाष घेतला आणि श्री. रमेश नावाच्या व्यक्तीकडे दिला. श्री. रमेश यांना याविषयी सांगून ‘२ तालुक्यांतील गावात अशी स्थिती आहे, तर पूर्ण गोव्यातील गावामध्ये मूर्तीकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किती मूर्ती ठेवल्या असतील, तुम्ही जरा चौकशी करा’, असे सुचवले. तेव्हा श्री. रमेश म्हणाले की, आमचे कर्मचारी मूर्तीकाराकडे तपासणी करायला गेले आहेत. त्यांना कळवतो.
– श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा