भारतियांची दिशाभूल करणारे आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी !

(‘यू ट्यूबर’ म्हणजे ‘यू ट्यूब’द्वारे व्हिडिओ प्रसारित करणारी व्यक्ती)

‘यू ट्यूबर’ ध्रुव राठी यांच्याविषयी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या काळात बरीच चर्चा झाली. ‘त्यांनी सत्ताधार्‍यांना नामोहरम केले, त्यांचे खरे स्वरूप उघड केले, सत्ताधार्‍यांची ‘पोलखोल’ केली’, वगैरे वगैरे विरोधकांनी त्यांच्याविषयी स्तुतीसुमने उधळली. काँग्रेसने तर काही शहरांमध्ये त्यांचे व्हिडिओ लोकांना पहाण्यासाठी मोठ्या ‘स्क्रीन्स’ लावल्या होत्या. महाराष्ट्रात स्वत: उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आणि पत्रकार रवीश कुमार यांचे आभार मानले. अशा सर्व विरोधक राजकारण्यांच्या मुखी अशा मंडळींची नावे असतात. ही व्यक्ती आणि सत्ताधार्‍यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणारी ही मंडळी आहेत तरी कोण ? असा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी यू ट्यूबर ध्रुव राठी

१. सध्याचा काळ हा यू ट्यूबर यांचा…

सध्याचा काळ हा यू ट्यूबरचा आणि सामाजिक माध्यमांचा आहे. यू ट्यूब या सामाजिक माध्यमावर व्हिडिओ प्रसिद्ध करून जो लोकांना माहितीची आदानप्रदान करतो, लोकांचे मनोरंजन आणि ज्ञानवर्धन करतो, अशा व्यक्ती यू ट्यूबर म्हणून ओळखल्या जातात.

प्रसारमाध्यमांनी त्यांची विश्वासार्हता गमावल्यामुळे लोक सत्य, योग्य आणि बातमीमागील माहितीसाठी सामाजिक माध्यमे जसे ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर), फेसबुक, यू ट्यूब यांचा आधार घेतात. लोकांना वाचून माहिती जाणून घेण्यापेक्षा माहिती व्हिडिओद्वारे समजून घेणे अधिक सोपे जाते; कारण ते दृकश्राव्य असते. व्हिडिओद्वारे सादरकर्ता अधिकाधिक प्रभावीपणे विषय मांडू शकतो. त्यामुळे सध्या यू ट्यूबला मोठी चलती आहे. यू ट्यूबवर स्वत: सिद्ध केलेला व्हिडिओ अपलोड करून, त्याचा अधिकाधिक प्रसार करून ‘लाईक्स’ मिळवणे, प्रसारित करणे, अधिकाधिक लोकांनी बघणे यांसाठी काही जण प्रयत्न करतात. त्यांपैकी काहींच्या व्हिडिओज्ना त्यांनी चांगले विषय दर्जेदार पद्धतीने मांडल्याने लाखोंमध्ये पाहिले जातात आणि त्यांच्या व्हिडिओ वाहिनीची नियमित दर्शकसंख्यासुद्धा (सबस्क्राईबर) लाखांमध्ये जाते. सध्या असे करून लाखो रुपये मिळवणे, हा एक व्यवसाय झाला आहे. या व्यवसायात यश मिळालेले हे लाखो वाचकांसह, पैसे मिळण्यास पात्र होतात. परिणामी त्यांना प्रसिद्धी, पैसा असे सर्व मिळते, तसेच अधिकाधिक लोक व्हिडिओ चित्रीकरण, एडिटिंग (संपादन), मांडणी हे शिकून एकतर यूट्यूब वर वृत्तवाहिनी चालू करतात, काही जण त्यांच्या क्षेत्रातील माहिती देणारी वाहिनी चालू करतात, काही जण मनोरंजाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात, तर काही जण मुक्त पत्रकारितेसाठी त्याचा उपयोग करतात.

श्री. यज्ञेश सावंत

२. ध्रुव राठी यांच्याविषयी…

सध्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांची पुढील पिढी कार्यरत झाली आहे. ही पिढी सर्व विषयांवरील जसे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय अशा कोणत्याही विषयाची माहिती तुम्हाला तार्किकदृष्ट्या त्यांना वाटेल तशी आणि तुम्हाला पटेल, अशी यू ट्यूबच्या माध्यमातून देत आहे. या माहितीत काही माहिती पूर्ण खरी असते, काही माहिती चुकीची असते, काही माहिती अर्धसत्य असते, काही माहिती भ्रमित करणारी आणि काही माहिती निव्वळ धूळफेक करणारे तर्क असतात. वाचकांना काही काळ पूर्ण सत्य माहिती सांगितली की, त्यांचा सांगणार्‍यावर विश्वास बसतो आणि ही प्रक्रिया पूर्ण झाली की, मग सांगणारा त्याची विचारसरणी, त्याचे जगावेगळे तर्क वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणे देऊन वाचकाच्या गळी उतरवून त्याची दिशाभूल करण्यास सिद्ध होतो. ही प्रक्रिया सध्याचे आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी करत आहेत. त्यामुळे त्यांचा खोटेपणा त्वरित लक्षात येणे, त्यांचा प्रतिवाद करणे, हे काही वेळा कठीण जाते. काही वेळा काहीच लक्षातही येत नाही. तसाच प्रकार ध्रुव राठी यांच्या संदर्भात झाला आहे.

ध्रुव राठी हे मूळचे हरियाणा राज्यातील असून सध्या जर्मनी येथे स्थायिक आहेत. यू ट्यूबर असण्यासह ते विविध देशांत प्रवास करून तेथील प्रवासातील अनुभव, चांगल्या-वाईट गोष्टी लोकांपर्यंत पोचवतात. सध्या यू ट्यूबवर त्यांचे २ कोटी ४० लाखांहून अधिक दर्शक आहेत, म्हणजे एवढे ते लोकप्रिय झाले आहेत. मुख्य म्हणजे त्यांना सर्वाधिक दर्शकसंख्या ही निवडणुकांच्या काळात मिळाली आहे.

३. समाजद्रोही उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचे उदात्तीकरण

जॉर्ज सोरोस

एखाद्या देशातील सत्ताधीश स्वत:ला अपेक्षित असे न करता, त्याच्याविरुद्ध कृती करत असेल, तर तो देश अस्थिर करणे, देशात सामाजिक, राजकीय गदारोळ निर्माण करणे, देशातील आंदोलने चिघळवणे, असे प्रकार प्रचंड पैसे ओतून केले जातात. त्यातील ‘टूलकीट’ हा एक भाग असला, तरी ही षड्यंत्रे दीर्घकालीन कार्यरत ठेवावी लागतात. त्यासाठी संबंधित देशांतील स्वत:च्या विचारसरणीशी मिळतेजुळते लोक हेरून त्यांना देशविरोधी कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येते आणि नंतर देशातील प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे सत्ताधिशांविरुद्ध, लोकशाही व्यवस्थेविरुद्ध निखारा पेटता ठेवावा लागतो. यासाठी पैसा पुरवणार्‍यांमध्ये सर्वांत अग्रस्थानी नाव घेतले जाते ते जॉर्ज सोरोस यांचे ! सोरोस हे साम्यवादाला अनुकूल असून भारत अस्थिर करण्याच्या मोठ्या कटाचा ते एक भाग आहेत. या जॉर्ज सोरोस यांच्याविषयी राठी हे सोरोस ज्येष्ठ पर्यावरणवादी, सुधारणावादी, चांगले अर्थतज्ञ वगैरे त्यांचे गुणवर्णन करतात. चांगल्या स्थितीत असणारी इंग्लंडची बँक पूर्णत: डबघाईला येण्यासाठी सोरोस हेच कारणीभूत होते.

जॉर्ज सोरोस हे राठी यांच्या दृष्टीने अनेक देशांमधील लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतात. याच सोरोस यांनी दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या सैन्याला ज्यू कुटुंबियांची माहिती दिली होती, ज्यामुळे हिटलरला त्यांचा सहज नरसंहार करता आला. स्वत:चे  ज्यू नाव त्यांनी लपवले होते. असे केल्याविषयी सोरोस यांना ‘काही पश्चात्ताप होत आहे का ?’, हे विचारल्यावर त्यांनी सरळ ‘नाही’, असेच सांगितले. स्वत: मूळचे हंगेरी देशातील असूनही बेकायदेशीरपणे घुसखोरांना त्यांच्या देशात घुसवले होते. अशा व्यक्ती ज्यांना ‘थोर’ वाटतात, त्या स्वत: किती ‘लहान’ असतील, हे आपल्याला लक्षात येऊ शकते. सोरोस यांची ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ ही संस्था अनेक देशांमध्ये काम करते. तेथील राष्ट्रविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम करते.

४. भारतात हुकूमशाही येत असल्याचे दिशाभूल करणारे दावे !

भारतात निवडणूक प्रक्रियेद्वारे उमेदवार आमदार आणि खासदार म्हणून निवडले जातात. असे असले तरी राठी यांच्या मते ‘मोदी एक हुकूमशाह असून भारतात ७० टक्के हुकूमशाही आली आहे’, असे ते सांगतात. भारतात हुकूमशाही असती, तर राठी यांना केव्हाच बेड्या घालून देशात आणून भारतविरोधी वक्तव्यांविषयी त्वरित शिक्षा झाली असती; मात्र तसे झालेले नाही. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) हटवण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता, श्रीराममंदिरालाही विरोध केला होता, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे पर्यटक पाठ फिरवतील, अशी काही भाकिते त्यांनी वर्तवली होती, जी पूर्णपणे खोटी ठरली. आपचे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्यघोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली, तेव्हा या अटकेला त्यांनी विरोध केला होता. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे वगैरे असे अकलेचे तारे तोडले होते.

५. राष्ट्रनिष्ठ माध्यमे, पत्रकार यांना ‘गोदी मिडिया’ म्हणून हिणवणे !

राष्ट्र आणि धर्म प्रेमी यू ट्यूबर अन् प्रसारमाध्यमे यांना ‘गोदी मिडिया’ (मोदी यांची प्रशंसा करणारी, त्यांच्या कृतींना चांगले म्हणणार्‍या माध्यमांना विरोधकांकडून ‘गोदी मिडिया’, असे नाव ठेवले आहे.), असा ते उल्लेख करतात. हा उल्लेख भारतातील साम्यवादी माध्यमेही करतात. राठी यांच्या दृष्टीने ते भारतातील खरी परिस्थिती जनतेसमोर आणून, भारताला पूर्ण हुकूमशाही राजवट बनण्यापासून वाचवून मोठे राष्ट्रकार्य करत आहेत. त्यांना विरोध करणारे, त्यांचा वैचारिक गोंधळ, वैचारिक चुका लक्षात आणून देणारे हे ‘गोदी मिडिया’चा भाग आहेत, म्हणजे एकतर तथ्य नीट मांडायची नाहीत, दिशाभूल करणारी माहिती द्यायची आणि त्याचा कुणी विरोधही करायचा नाही, ही राठी यांची मानसिकता आहे.

६. हिंदूंच्या प्रश्नांवर तोंडाला चिकटपट्टी !

बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांविषयी ते गप्प बसले होते. हिंदूंवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊन एरव्ही भारतातील, जगातील प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर व्हिडिओ सिद्ध करणारे राठी हे शांत होते. लव्ह जिहादच्या एवढ्या घटना भारतात घडत आहेत, त्याविषयी भारतियांना जागृत करणारे व्हिडिओ बनवावे, असे त्यांना वाटत नाही. यातच सर्व आले. जॉर्ज सोरोस यांच्याप्रमाणे त्यांनी भारतविरोधी लेखक, पत्रकार हर्ष मंदेर यांना त्यांनी ‘विद्वान व्यक्ती’, ‘अनेक पुस्तके लिहिणारी व्यक्ती’ म्हणून बहुमान दिला आहे. याच हर्ष मंदेर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (‘सीएए’चा) विरोध रस्त्यावर उतरून केला होता. ‘सीएए कायदा पारित झाल्यास स्वत: मुसलमान बनेन’, असेही टोकाचे विधान त्यांनी केले होते. रवीश कुमार यांना राठी हे स्वत:चे मार्गदर्शक मानतात. रवीश कुमारही अखंड भारतविरोधी वक्तव्ये करणे, मोदी सरकारच्या योजनांचा विरोध, भारत विरोधकांची बाजू घेणे असेच करत आले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचाही उपयोग सरकारविरोधी वातावरण सिद्ध करण्यासाठी करतात.

७. नीतीमत्ताबाह्य व्यवसायांना प्रोत्साहन देणे

ध्रुव राठी यांनी लोकांना ‘इथर लाईट’ आस्थापनात पैसे गुंतवण्यास सांगितले. ‘पी.एन्.पी. करन्सी’ ही ‘क्रिप्ट्रो करन्सी’चे (आभासी चलन) विज्ञापन केले होते. इथर लाईट आस्थापन नंतर बनावट आस्थापन, तर पी.एन्.पी. करन्सीही बनावट चलन असल्याचे नंतर लक्षात आले. ज्याचे मूल्य ९० टक्के खाली घसरल्यामुळे हे चलन विकत घेतलेल्या अनेकांचे पैसे बुडाले असतील. या दोन्ही गोष्टी बनावट निघाल्यावर त्यांनी स्वत:चे व्हिडिओ संपादित करून पुन्हा अपलोड केले.

८. अतार्किक सूत्रे

भारतातील विकासकामांविषयी त्यांचे हास्यास्पद प्रश्न आहेत. त्यामध्ये भारतात एवढे महामार्ग आणि मोठी विमानतळे यांची आवश्यकता काय आहे ? केवळ देशातील ८ टक्के लोकांसाठी हे केले जात आहे का ? असे प्रश्न करणारे राठी हे स्वत: जर्मनीच्या मोठ्या रस्त्यांवर वाहन गतीने चालवण्याचा आनंद घेतात.

९. खरे स्वरूप ओळखा !

या लेखात केवळ काही महत्त्वाची सूत्रे घेऊन त्यांचे खंडण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे बुद्धीप्रामाण्यवादी, साम्यवादी विचारवंत यांच्या अनेक पिढ्यांनी त्यांचे ज्ञान पाजळून भारतियांना भ्रमित केले आहे. एकूणच भारताची येनकेन प्रकारेण हानीच कशी होत राहील, भारताच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नांना खीळ कशी बसेल, यासाठी या प्रभावशाली व्यक्ती प्रयत्न करत असतात. त्यांची विधाने, अभ्यास यांना न भूलता सत्य शोधण्याची, तुलनात्मक अभ्यास करण्याची सवय जनतेने लावल्यास अशांचे खरे स्वरूप त्यांना लक्षात येईल आणि ते त्यांच्या षड्यंत्रापासून स्वत:ला दूर ठेवू शकतात अन् त्यांच्या विचारसरणीने प्रभावित असलेल्या इतरांचेही प्रबोधन करू शकतात. साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची ही लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे.’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२०.८.२०२४)

अर्धसत्य माहिती सांगणे

मुंबईत मतमोजणीच्या वेळी एक घटना घडली होती. त्यामध्ये मुंबईतील एका भागातील मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये प्रथम ‘अमोल कीर्तीकर विजयी’, असे जाहीर झाले होते; मात्र काही मिनिटांमध्ये ‘रवींद्र वायकर विजयी झाले’, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. यात एका वेगळ्याच घटनेची बातमी आली आणि ती म्हणजे ‘वायकर यांच्या मेव्हण्याचा भ्रमणभाषद्वारे इ.व्ही.एम्. (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) ‘अनलॉक’ होऊ शकतो’, अशी होती. मतदानकक्षात कुणालाही भ्रमणभाषसंच घेऊन जाण्याची अनुमती नसतांना वायकर यांचे मेहुणे हा भ्रमणभाष कक्षात घेऊन आले होते. त्यामुळे मतदानयंत्रे मेव्हण्याच्या भ्रमणभाषशी जोडली जाऊन त्याद्वारे मतदानाच्या आकडेवारीत फेरफार करून वायकर विजयी झाले’, अशी बातमी मुंबईतील प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली. याचा उपयोग ध्रुव राठी यांनी त्यांच्या व्हिडिओसाठी केला. निवडणूक आयोगाने ‘असे काही झाले नाही’, असे सांगत इंग्रजी दैनिकाला क्षमा मागण्यास आणि योग्य बातमी लावण्यास सांगितले. दैनिकाने योग्य बातमी लावली; मात्र येथे राठी यांनी ती बातमी आहे तशी प्रसिद्ध न करता एक ओझरता उल्लेख केला. येथे सत्ताधार्‍यांचा आक्षेप आहे. ती वस्तूस्थिती न मांडता, खोटी बातमीच लोकांपुढे दाखवून संभ्रम निर्माण करण्यात आला.

– श्री. यज्ञेश सावंत

संपादकीय भूमिका

साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !