भाविकांनी आक्रमक होत महालगावात वाजत-गाजत काढला मोर्चा !
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) – सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात विविध पोलीस ठाण्यांत नोंद झालेले गुन्हे तात्काळ रहित करावेत. यापुढे गुन्हे नोंद करू नयेत, या मागणीसाठी महालगाव येथे १८ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन वीरगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिले, तसेच महाराजांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी त्यांनी दिली.
पांचाळे (तालुका सिन्नर) येथे ‘अखंड हरिनाम सप्ताहा’च्या प्रवचनामध्ये मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप महंत रामगिरी महाराजांवर करण्यात आलेला आहे. यामुळे रामगिरी महाराजांवर राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद झालेले आहेत. आता यापुढे पुन्हा गुन्हे नोंद होऊ नयेत आणि जे गुन्हे नोंद झालेले आहेत, ते शासनाने तात्काळ रहित करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनाला सकाळी ११ वाजता येथील श्रीराम मंदिरापासून टाळ, मृदंग वाजत प्रारंभ झाला. गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोर्चाचा समारोप झाला. यात अनेक गावांतील भाविक सहभागी झाले होते.