‘सनातनचे कार्य शीघ्रतेने वाढत आहे. ‘कार्य अधिक आणि ते करायला साधक अल्प’, अशी स्थिती सर्वच सेवांच्या क्षेत्रांत आहे. बर्याच साधकांना त्यांच्या सेवांचे दायित्व असणार्या साधकांच्या संदर्भात ‘ते साधक पुष्कळ सेवा सांगतात, सारखे चुका दाखवतात, सेवा पूर्ण करण्याविषयी सारखा पाठपुरावा करतात, आमची स्थिती समजून घेत नाहीत’ यांसारख्या अडचणी असतात. दायित्व असणार्या साधकांनी ‘साधकांकडून सेवा पूर्ण करवून घेण्यासह त्यांना प्रेमाने समजून घेणे’, हा त्यांच्या समष्टी साधनेचा एक भागच आहे. यामध्ये बर्याचदा दायित्व असणारे साधक अल्प पडतात; म्हणून त्यांनी याविषयी प्रयत्न वाढवायला हवेत.
साधकांनीही ‘आपण स्वतः दायित्व असलेले साधक आहोत’, या भूमिकेतून विचार केला, तर त्यांना दायित्व असलेल्या साधकांना समजून घेणे सोपे जाईल, त्यांच्याही अडचणी लक्षात येतील आणि त्यांच्याविषयी असलेली एक प्रकारची नकारात्मकतेची किंवा कटुतेची भावना अल्प व्हायला साहाय्य होईल. साधकांनी स्वतःला पुढील प्रश्न विचारावेत.
१. आपल्या सर्व अडचणी दायित्व असलेल्या साधकांच्या पूर्णतः लक्षात येतीलच असे नाही. अशा वेळी आपण स्वतः किंवा अन्य कुणाचे तरी साहाय्य घेऊन त्या अडचणी दायित्व असणार्या साधकांना मनमोकळेपणे सांगणे अपेक्षित आहे. याद्वारे ‘आपल्या मनाचा संघर्ष अल्प करण्यासह दायित्व असणार्या साधकांचे चुकत असल्यास ते त्यांच्या लक्षात आणून देऊन ‘त्यांना साधनेत साहाय्य करणे’, हा आपल्या साधनेचाच भाग आहे’, हे आपण लक्षात घेतो का ?
२. ‘दायित्व असलेल्या साधकांच्या माध्यमातून गुरुच आपल्याला सेवा सांगत असून तेच आपल्याकडून ती पूर्णही करून घेणार आहेत’, असा भाव अनेक साधकांनी ठेवल्यावर त्यांना ‘सेवेत मनाचा संघर्ष न होता सेवा आनंदाने आणि समयमर्यादेत पूर्ण होते’, अशी अनुभूती येते.’ असा भाव ठेवायचा आपण प्रयत्न करतो का ? याचाही साधकांनी विचार करावा.
३. दायित्व असलेल्या साधकांनी आपल्याला सांगितलेल्या सेवांचा पाठपुरावा केला, आपल्याला सारखे साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगितले, तरी हे सर्व आपण साधनेच्या दृष्टीने स्वीकारून तसे प्रयत्न केले, तर आपलीच आध्यात्मिक प्रगती लवकर होणार.
४. दायित्व असलेल्या साधकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सेवा नीट जमत नाहीत किंवा वेळेत पूर्ण होत नाहीत, यामागे आपले ‘नियोजन नीट न करणे, कार्यपद्धतींचे पालन न करणे, सेवेविषयीचा अभ्यास अल्प पडणे’ अशासारखे स्वभावदोष कारणीभूत असतात. या दोषांचे आपण मनापासून चिंतन करून ते दूर करण्यासाठी कठोरपणे प्रयत्न करतो का ?
५. ‘दायित्व असलेले साधक आपल्या अडचणी समजून घेत नाहीत’, ही आपली अडचण वरिष्ठांकडे मांडतांना काही वेळा आपण अर्धवट किंवा एकांगी किंवा आपल्याला सोयीस्कर पद्धतीने सांगतो. ‘असे करणे साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे’, याचा आपण विचार करतो का ?
६. काही वेळा ‘मला अधिक कळते’, असा अहं निर्माण झाल्यामुळे आपल्याकडून दायित्व असलेल्या साधकाला न्यून लेखणे, त्याच्याकडून एखादा निर्णय मिळण्यास विलंब झाल्यास त्यामागील कारण जाणून न घेता प्रतिक्रियात्मक बोलणे, त्याच्याविषयी अन्य साधकांमध्ये नकारात्मकता पसरवणे यांसारख्या कृती होतात. ‘यातून आपण आपल्याच साधनेची हानी करून घेत आहोत’, हे आपण लक्षात घेतो का ?
७. दायित्व असलेले साधक सारखा सेवांचा पाठपुरावा का करतात ? याचे कारण म्हणजे त्यांना सर्व सेवांचा आढावा त्यांचे दायित्व असलेल्या साधकांना द्यावा लागतो. बर्याच सेवा समयमर्यादेत पूर्ण करायच्या असतात. गुरुकार्याची हानी होऊ नये, यासाठी समयमर्यादेचे बंधन पाळणे बर्याचदा अपरिहार्य असते. यासाठी दायित्व असलेले साधक स्वतःही बरेच श्रम घेऊन प्रयत्नशील असतात. त्यांनी सेवेसाठी आपला सारखा पाठपुरावा करण्यामागील हे कारण आपण समजून घेतो का ?
८. दायित्व असलेले साधक सारखे चुका का सांगतात ? ‘चुकांमुळे आपली साधना व्यय होऊ नये आणि गुरुकार्यासाठी आपण लवकर घडावे’, एवढीच निर्मळ आकांक्षा त्यांच्या मनात असते. हे त्यांचे प्रेम आपण समजून घेतो का ?
९. दायित्व असलेल्या साधकांकडे पुष्कळ सेवांचे दायित्व असले, तरी आपल्याप्रमाणेच त्यांनाही शरीर, मन आणि बुद्धी यांच्या मर्यादा आहेत, तरीही ते गुरुकार्य होण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी यांचा पुष्कळ त्याग करतात. याबद्दल आपल्या मनात त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव असतो का ?
१०. आपण दायित्व असलेल्या साधकांविषयी वरिष्ठांकडे अडचणी मांडतो, तेव्हा दायित्व असलेल्या साधकांनी आतापर्यंत आपल्यासाठी प्रेमाने केलेल्या कृतींविषयीही आपण सांगतो का ?
११. आपल्याला दिलेली एक सेवा पूर्ण करणे सोपे असते; पण दायित्व असलेल्या साधकांप्रमाणे अनेक सेवांचे दायित्व घेऊन त्या पूर्णत्वास नेणे, हे कठीण असते. ‘त्यांच्यातील कोणत्या गुणांमुळे त्यांना ते जमते’, याचा अभ्यास करून ते गुण आपण आपल्यात आणायचा मनापासून प्रयत्न करतो का ?’
– (पू.) संदीप आळशी (७.८.२०२४)