ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिक तिसर्यांदा हातात मेणबत्ती घेऊन निदर्शने करणार
म्हापसा, १२ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्याच्या हणजूण ते हरमल या उत्तर किनारपट्टीत १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत २३ ट्रान्स पार्ट्यांचे (टॅक्नो इ.डी.एम्. पार्ट्यांचे) आयोजन केल्याची विज्ञापने सामाजिक माध्यमांत झळकत आहेत. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय केवळ पोकळ आश्वासने देत असल्याने हणजूण आणि वागातोर येथील ग्रामस्थांनी आता या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी हणजूण पोलीस ठाण्याच्या समोर मेणबत्ती घेऊन निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
१. विशेष म्हणजे वागातोर आणि हणजूण येथील गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केलेल्या नाईट क्लबने पार्ट्यांचे आयोजन केल्याची विज्ञापने सामाजिक माध्यमांत प्रसारित केली आहेत.
२. हरमल येथे १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत एकूण ४ दिवस खुल्या जागेत नाईट पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
३. या पार्ट्यांसाठी ‘ऑनलाईन’ तिकीट विक्रीलाही प्रारंभ झाला आहे.
४. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासारख्या विविध उपाययोजना करण्याचा आदेश गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेला आहे.
ध्वनीप्रदूषण रोखण्याची केवळ पोकळ आश्वासने : कृती नाहीच !
हणजूण पोलीस ठाण्याच्या समोर मेणबत्ती घेऊन निदर्शने करण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयाविषयी अधिक माहिती देतांना स्थानिक नागरिक आंतानियो मोराईस म्हणाले, ‘‘सरकार ध्वनीप्रदूषणाच्या सूत्रावर नेहमी आमची फसवणूक करत आहे. स्थानिक आमदारांनी स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या समवेत बैठकीत रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषण होणार नसल्याचे यापूर्वी सांगितले होते; मात्र बैठक झालेल्या दिवशी रात्रीच ध्वनीप्रदूषण झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडणुकीच्या पूर्वी आम्हाला भेटून अशाच स्वरूपाचे आश्वासन दिले; मात्र त्या अनुषंगाने कुठलीही कृती झालेली नाही. यापूर्वी आम्ही ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात २ वेळा मेणबत्ती हातात घेऊन निदर्शने केली होती.
संपादकीय भूमिकाहणजूण आणि वागातोर येथील ग्रामस्थांवर अशी निदर्शने करण्याची वेळ येणे प्रशासनाला लज्जास्पद ! |