देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. विद्या विलास गरुड यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी मागील १२ वर्षांपासून सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. गुरुदेवांच्या कृपेने साधक आई-वडिलांमुळे (सौ. विमल आणि श्री. विलास गरुड यांच्यामुळे) मी साधना करू लागले. आश्रमात मी नियतकालिकांच्या संदर्भातील सेवा करते. ही सेवा करतांना ‘देवाने मला कसे घडवले ?’, या संदर्भातील सूत्रे येथे दिली आहेत.

कु. विद्या गरुड

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी केलेले प्रयत्न

१ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी सद्गुरु, संत अन् सहसाधक यांचे पुष्कळ साहाय्य होणे : ‘आरंभी माझ्यात ‘मनमोकळेपणाचा अभाव, भीडस्तपणा, प्रतिमा जपणे, अपेक्षा करणे आणि स्वतःच्या मतावर ठाम रहाणे’, हे स्वभावदोष अधिक प्रमाणात होते. मला नियतकालिकांच्या संदर्भातील सेवा मिळाली. या सेवेमुळे माझा समष्टीशी अधिक संपर्क येणार होता आणि त्यामुळे माझे स्वभावदोष अन् अहं यांची तीव्रता न्यून होण्यास मला साहाय्य होणार होते. यासाठी मला सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार, साधक आणि कुटुंबीय यांचे पुष्कळ साहाय्य झाले.

१ आ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षा न्यून होण्यासाठी प्रेमभाव वाढवण्याचा प्रयत्न करणे : सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला जाणीव करून दिली की, ‘मला जे वाटते, ते कितीही योग्य असले, तरी प्रत्येकाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता भिन्न असल्याने ‘स्वतःला जे जमते, जे कळते’, ते समोरच्या साधकाला कळायलाच हवे’, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.’ त्यांनी मला प्रेमभाव वाढवायला सांगितला. त्यानुसार प्रयत्न केल्यावर मला समोरच्या साधकाच्या स्थितीला जाऊन समजून घेता येऊ लागले, तसेच सर्वांप्रती प्रेमही वाटू लागले. देवानेच माझ्याकडून हे प्रयत्न करून घेतले.

१ इ. ‘सेवेत पालट झाल्यावर वाईट वाटणे; परंतु नंतर सर्वच सेवा कराव्या लागणार’, असे सहसाधकांनी सुचवल्यावर मन सकारात्मक होऊन सर्व सेवा स्वीकारता येणे : मी नियतकालिकांच्या संदर्भातील सेवा करू लागल्यावर एक वर्षाने मला अन्य एका आवृत्तीची सेवा करण्यास सांगण्यात आले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, मी सेवा नीट करत नाही; म्हणून मला दुसरी सेवा दिली आहे. हा विचार मी आमच्या उत्तरदायी साधकांना सांगितला. ते मला म्हणाले, ‘‘पुढे ‘देवाला तुला नियतकालिकांच्या सर्वच आवृत्त्यांची सेवा द्यायची असेल’, असा विचार कर !’’ तेव्हा माझे मन सकारात्मक होऊन मला मनापासून सेवा स्वीकारता आली. पुढील एका वर्षात मला सर्वच नियतकालिकांच्या संदर्भातील सेवा करण्याची संधी मिळाली.

२. सर्व नियतकालिकांची सेवा मिळाल्यावर व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा या दोन्हींची घडी बसवण्याचे प्रयत्न करणे

ही सेवा करतांना देवाने मला अनेक सूत्रे शिकवली आणि व्यष्टी साधना अन् समष्टी सेवा या दोन्हींची घडी बसवण्याचाही प्रयत्न करून घेतला. सेवा करतांना मी ‘अन्य साधकांना सेवा शिकवणे, संगणकीय प्रणाली शिकवणे, साधकांच्या अडचणी सोडवणे, या दृष्टींनी प्रयत्न केले. ‘सेवेचा बारकाईने अभ्यास आणि नियोजन केल्यास, तसेच समयमर्यादा घातल्यास फलनिष्पत्ती वाढू शकते’, हे मला शिकायला मिळाले. सेवा करतांना स्वतःची फलनिष्पती वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास ‘भगवंत बरीच सूत्रे सुचवतो आणि चुका न्यून होऊन सेवा परिपूर्ण, अचूक अन् अल्प वेळेत पूर्ण होते’, असे मला नेहमी अनुभवायला येते.

३. ‘कर्तेपणा जाऊन देवच सर्वकाही करून घेत आहे’, याची अनुभूती येऊन आतून शांत आणि स्थिर वाटणे

पूर्वी सेवा करतांना ‘कर्तेपणा आणि अपेक्षा’ यांचे सूक्ष्म परिणाम सेवेवर व्हायचे. कर्तेपणामुळे माझ्या मनावर अदृश्य ताण असायचा; परंतु मागील ‘काही मासांपासून सेवेचे नियोजन आणि प्रत्यक्ष कृती हे सर्व देवच करवून घेत आहे’, याची मला पदोपदी अनुभूती येत आहे. आता मला ताण न येता आतून पुष्कळ शांत आणि स्थिर वाटते. ‘देवच सर्वकाही करून घेणार आहे’, या माझ्या श्रद्धेत वाढ झाली आहे.

‘हे गुरुदेवा, ‘आपणच माझ्याकडून हे सर्व लिखाण करून घेतले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मला सदैव आपल्या चरणांशी रहाता येऊ दे आणि माझ्याकडून अपेक्षित अशी गुरुसेवा होऊ दे’, अशी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– कु. विद्या गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक