सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमी विक्रीमध्ये मोठा घोटाळा : मुख्यमंत्र्यांची अन्वेषण करण्याची हमी

गोवा विधानसभा अधिवेशन

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमीची विक्री करण्यात येत असून यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी अगदी अल्प दरात भूमी सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’ या आस्थापनाला गोव्यातील बेरोजगारी अल्प करण्यासाठी दिली होती; मात्र आता या भूमीची बांधकाम व्यावसायिकांना विक्री केली जात आहे. बांधकाम व्यावसायिक महागड्या दरात येथील सदनिकांची विक्री करू लागले आहेत, असा आरोप ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी २ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी केला. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘सांकवाळ येथील ‘झुवारी इंडस्ट्रीज’च्या भूमीच्या विक्रीच्या प्रकरणाचे सविस्तर अन्वेषण करणार आहे. अन्वेषणात अशी भूमी बांधकाम व्यावसायिकांना विक्री केल्याचे आढळल्यास त्यांना दिलेली अनुज्ञप्ती रहित केली जाणार आहे.’’ (भूमी बांधकाम व्यावसायिकांना विकून सदनिकाही बांधल्या जाईपर्यंत प्रशासनाला याचा पत्ता लागला नाही का ? गेल्या वर्षभरापासून हे सूत्र चर्चेत आहे, तरीही याविषयी कोणतेच अन्वेषण का झाले नाही ? – संपादक)