मुंबई, नवी मुंबई येथे अनेक जिज्ञासूंनी घेतला सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचा लाभ ! 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुलभ होईल ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय

अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालय

मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने माहीम, विलेपार्ले आणि खारघर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. तीनही ठिकाणी ५०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. माहीम येथे उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी, खारघर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सिद्ध विद्या, विलेपार्ले येथे हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई समन्वयक सौ. जान्हवी भदिर्के यांनी मार्गदर्शन केले.

अधिवक्त्या सिद्ध विद्या, मुंबई उच्च न्यायालय

देशातील सर्व समस्यांवर उपाय ‘हिंदु राष्ट्र’ ! – अधिवक्त्या सिद्ध विद्या, मुंबई उच्च न्यायालय

देश स्वतंत्र झाला, तेव्हाच गोहत्या बंदी व्हायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी असली, तरी शेजारील कर्नाटक राज्यात गोहत्या बंदी नसल्याने महाराष्ट्रातील गोवंश सीमापार नेऊन कापला जातो. त्यामुळे विविध राज्यांमध्ये गोहत्या होण्यापेक्षा या देशात कायद्याने हिंदु राष्ट्राची स्थापना करूया. देशातील सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणार्‍या समर्थ रामदासस्वामी यांसारख्या संतांची राष्ट्राला आवश्यकता आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणे त्याग, प्रेरणा आहे. उद्दिष्ट निश्चित आहे. त्यांच्या दर्शनाने राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे संत असतील, तरच राष्ट्राचा उद्धार होईल. भारतातील सर्व आचार्य, संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सनातन संस्थेशी जोडायला हवे. त्यांना सहकार्य करायला हवे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जायला हवे. असे केल्यास हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा मार्ग सुलभ होईल. सर्वांनी एकत्र येऊन कार्य केल्यास भारताला हिंदु राष्ट्र करणे शक्य होईल, असा विश्वास उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय यांनी व्यक्त केला. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथील सोहळ्यात त्यांनी वरील मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, ‘‘गुरूंना मानणारे आणि ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवणारे अनेक आहेत; परंतु खर्‍या अर्थाने स्वत:मध्ये गुरुभक्ती आहे का ? गुरूंनी सांगितल्यानुसार आपण मार्गक्रमण करतो का ? हे पहायला हवे. जेव्हा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मार्गक्रमण करू, त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा अंगीकार करू, तेव्हाच आपण शिष्य होण्यास पात्र ठरू. मी असे काही संत पाहिले आहे की, जे भजन-कथा सांगतात; मात्र त्यामध्ये राष्ट्रकार्याला स्थान नसते. मी अनेक संतांना भेटलो; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे संत मला आजवरच्या आयुष्यात आढळले नाहीत, हे मी प्रभु श्रीरामांना स्मरून सांगतो.’’

भगवंत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहे !

भारत जेव्हा विश्वगुरु होता, तेव्हा भारतातील राजे गुरूंना शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कारभार करत होते. आपण हिंदु राष्ट्राची स्थापनेची वार्ता करतो; परंतु भारताचे झपाट्याने इस्लामीकरण चालू आहे. अशा वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सनातन संस्थेच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचे अद्भुत कार्य करत आहेत. भगवंत त्यांच्या माध्यमातून समस्त हिंदूंना मार्गदर्शन करत आहे, असे मी समजतो. – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय