सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) आदिती देवल (वय ६६ वर्षे) !

 आज २०.७.२०२४ या दिवशी कै. (श्रीमती) आदिती देवल यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

 ‘माझी आई कै. (श्रीमती) आदिती देवल हिचे हृदयविकाराच्या झटक्याने ८.७.२०२४ या दिवशी निधन झाले. माझ्या लहानपणापासून मला आईमधील जाणवलेले गुण, शिकायला मिळालेली सूत्रे आणि तिच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) आदिती देवल

१. प्रतिकूल परिस्थिती धिराने स्वीकारणे

सौ. राजलक्ष्मी जेरे

आई लहानपणापासूनच पुष्कळ हुशार होती. तिचा शाळेमध्ये नेहमी पहिला क्रमांक येत असे. तिच्या घरची परिस्थिती साधारणच होती. लहान वयातच तिच्या आईचे निधन झाले; पण आईने ते सर्व धिराने घेतले.

२. मुलींना प्रेमाने आणि शिस्तीने वाढवणे

आई लहानपणापासून शिस्तप्रिय होती. ती आम्हाला नेहमी शिस्तबद्ध वागण्याचे महत्त्व सांगायची. आईने आम्हाला अतिशय प्रेमाने आणि शिस्तीने वाढवले. ती आम्हाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही स्तरांवर मार्गदर्शन करत असे. तिच्यामुळेच आम्ही तिघी बहिणी साधनेत आलो.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा प्रत्येक शब्द आईसाठी शिरोधार्य असणे आणि गुरुदेवांवरील नितांत श्रद्धेमुळे तिला कठीण प्रसंगांतून बाहेर पडता येणे 

वर्ष १९९९ मध्ये आईने सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ती जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकली. गुरुदेवांनी प्रत्येक प्रसंगातून तिला अगदी अलगद बाहेर काढले. आईची गुरुदेवांवर नितांत श्रद्धा होती. प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये ती गुरुदेवांना शरण जायची. त्यांचा प्रत्येक शब्द हा तिच्यासाठी शिरोधार्य होता. ‘गुर्वाज्ञा’ म्हणून ती पूर्ण निष्ठेने त्याचे पालन करायची. ‘तिच्यामुळे अध्यात्म कसे जगायचे ?’, हे आम्ही अनुभवले.

४. अनेक वर्षांपूर्वी मृत झालेले नातेवाईक स्वप्नात आईच्या पायावर डोके टेकवतांना दिसणे आणि आईने मतभेद असूनही त्या नातेवाइकाच्या निधनानंतर त्यांना पुढची गती मिळण्यासाठी प्रार्थना केलेली असणे 

पूर्वी काही प्रसंगांमुळे आमच्या एका नातेवाइकाशी मतभेद झाले होते. काही वर्षांपूर्वी त्या नातेवाइकाचे निधन झाले. काही मासांपूर्वी ते नातेवाईक माझ्या स्वप्नात आले. स्वप्नात ते अगदी आनंदी दिसत होते. ते मला म्हणाले, ‘मी तुझ्या आईला भेटलो. मी आईच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.’ या स्वप्नाविषयी मी नंतर आईला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘गेले काही मास मी त्या नातेवाइकासाठी प्रार्थना करत होते, ‘ते कुठे अडकले असतील, तर त्यांना पुढची गती मिळू दे.’’

या प्रसंगातून ‘इतरांवर निरपेक्ष प्रेम कसे असावे ?’, हे मला शिकायला मिळाले. आई नेहमी आम्हाला सांगत असे, ‘इतर लोक कसेही वागले, तरी आपण चुकीचे वर्तन करायचे नाही.’ ही गोष्ट तिने केवळ बौद्धिक स्तरावर न ठेवता ‘आध्यामिक स्तरावर ती कृतीत कशी आणायची ?’, याचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. सर्वांवर तिचे निरपेक्ष प्रेम होते.

५. वडिलांच्या निधनानंतर आईने मायेतील गोष्टींचा त्याग करणे, तसेच व्यावहारिक गोष्टींमधील दायित्व पूर्ण करतांना तिने पूर्णवेळ साधना करण्याला महत्त्व देणे 

वर्ष २००९ पासून, म्हणजे गेले १५ वर्षे आई सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होती. वर्ष २००९ मध्ये आमच्या वडिलांचे देहावसान झाल्यानंतर आई आश्रमात रहाण्यास गेली. तिने सर्व परिस्थिती धिराने स्वीकारली आणि अगदी सहजपणे मायेतील गोष्टींचा त्याग केला. तिने कधीही स्वतःच्या दुःखाचे गार्‍हाणे कुणासमोर व्यक्त केले नाही. आमचे विश्रामबाग, सांगली येथे ‘डिपार्टमेंटल स्टोअर’ होते, तसेच शेती आणि इतरही व्यावहारिक गोष्टी होत्या; पण या सगळ्यांमध्ये ती कधीही अडकली नाही. तिने तिचे दायित्व अलिप्त राहून पूर्ण केले.

आई आश्रमात रहायला गेल्यानंतर आम्हाला कधीही तिची काळजी वाटली नाही. ती आश्रमात इतकी रमून गेली होती की, ‘आश्रम सोडून तिला अन्य कुठे जावे’, असे वाटायचे नाही. आम्ही बहिणी तिला ‘आमच्याकडे काही दिवस रहायला ये’, असे मागे लागायचो; पण ती ‘साधनेत आणि सेवेतच रहायला बरे वाटते’, असे म्हणायची. आश्रमातील सर्व साधक आईची आपुलकीने आणि प्रेमाने काळजी घ्यायचे. आम्ही आईला भेटायला गेलो की, साधक आमचीही आपुलकीने विचारपूस करायचे.

६. अखेरच्या क्षणापर्यंत आश्रमात गुरुदेवांच्या चरणी रहाण्याची आईची इच्छा गुरुकृपेने पूर्ण होणे

७.७.२०२४ या दिवशी आईला अकस्मात हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा आश्रमातील साधकांनी आईची सर्वतोपरी काळजी घेतली. तिला तातडीने रुग्णालयात भरती करून तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. ८.७.२०२४ या दिवशी आईचे निधन झाले आणि आम्हा कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हा साधकांनी आम्हाला पुष्कळ आधार दिला. प्रत्येक बारीक बारीक गोष्टही सर्व साधक जिव्हाळ्याने करत होते. साधकांच्या साहाय्याने आईचे अंत्यविधी पार पडले. आई आम्हाला म्हणायची, ‘माझे जे काही होईल, ते इथे आश्रमात गुरुदेवांच्या चरणीच होईल !’ तिची ही इच्छासुद्धा गुरुदेवांनी पूर्ण केली.

७. ‘आई रुग्णाईत आहे’, असे कळल्यानंतर आलेल्या अनुभूती 

अ. ‘आईला बरे नाही’, असे कळल्यानंतर पुष्कळ पाऊस असूनही देवाच्या कृपेने माझा प्रवास निर्विघ्नपणे झाला.

आ. प्रवासात मी नामजप करत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘परम पूज्य गुरुदेव आईच्या पलंगाजवळ उभे आहेत. आई त्यांच्याशी हसून बोलत आहे आणि गुरुदेवही तिच्याशी हसून बोलत आहेत. तेव्हा आईच्या चेहर्‍यावर आनंद जाणवत होता.’

इ. प्रवासात माझा अन्य नामजप बंद होऊन ‘श्री गुरुदेव दत्त।’ हाच नामजप सतत चालू होत होता.

८.  ९.७.२०२४ या दिवशी आईचे अंत्यदर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

अ. आईच्या मुखावर हास्य आणि आनंद दिसत होता. तिच्या डोक्याभोवती पिवळी प्रभावळ दिसत होती.

आ. आईचे सर्व अंग पिवळसर दिसत होते.

इ. ‘आईचा श्वासोच्छ्वास चालू असून तिचा नामजप चालू आहे’, असे वाटत होते. आईच्या दोन्ही हाताच्या बोटांच्या मुद्रा केलेल्या होत्या.

ई. मला वातावरणात चैतन्य जाणवत होते आणि हलकेपणा वाटून माझा नामजप होत होता. ‘आई आता अनंतात विलीन झाली असून ती परम पूज्य गुरुदेवांपाशी पोचली आहे’, असे विचार माझ्या मनात येत होते.

मायेतील सर्व पाश तोडून अखेरच्या क्षणापर्यंत गुरुचरणी सेवारत रहाणार्‍या कै. (श्रीमती) आदिती धनंजय देवल !

(पू.) सौ. शैलजा परांजपे

१. यजमानांच्या निधनानंतर सर्व कर्तव्ये पार पाडणे 

‘मिरज (जि. सांगली) येथील देवल घराणे पुष्कळ सधन होते. पूर्वी ते ‘सर्कसवाले देवल’ म्हणून प्रसिद्ध होते. कै. देवलकाकूंच्या घरची शेतीवाडी पुष्कळ होती. त्यांचे माहेरचे नाव ‘कु. अरुणा दाते’, असे होते. विवाह करून त्या देवल घराण्यात आल्या. देवलकाकूंना पूर्वीपासूनच साधनेची पुष्कळ आवड होती. त्यांचे यजमान म्हैसाळला असलेली त्यांची शेतीवाडी बघत असत. त्यांना तीन अपत्ये (तीन मुली) झाली. त्यांनी यजमानांच्या निधनानंतर सर्व कर्तव्ये पार पाडली. यजमान म्हैसाळची शेतीवाडी पहात असल्याने त्या त्यांचे विश्रामबाग (सांगली) येथील ‘देवल सुपर बाजार’ या दुकानाचे दायित्व सांभाळत असत.

२. प्रपंचात न अडकता साधनेला प्राधान्य देणे 

सनातन संस्थेविषयी माहिती कळल्यानंतर प्रपंच करत असतांना देवलकाकूंना साधनेविषयी ओढ निर्माण झाली. त्यामुळे त्या प्रपंचात फारशा अडकल्या नाहीत आणि त्यांनी साधनेला प्राधान्य दिले. त्या प्रारंभी मिरज आश्रमात सेवेला जात असत.

३. सनातन संस्थेमध्ये पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे

यजमानांचे देहावसान झाल्यानंतर देवलकाकू या प्रसंगाला धिराने सामोरे गेल्या. मुलींचे विवाह झाल्यानंतर त्यांनी सनातन संस्थेमध्ये पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला आणि कुणाच्याही भावनेला बळी न पडता संपत्तीच्या माया-पाशातून त्या अलगद दूर झाल्या. त्यांना तीन मुली असूनही गुरुकृपेने त्यांना स्वतःची आणि मुलींची काळजी वाटली नाही.

४. गुरुकृपेने प्रपंचातून योग्य वेळी बाहेर पडून आश्रमजीवनात सहजतेने समरस होणे

देवलकाकू रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ रहाण्यासाठी आल्या. ‘एवढ्या सधन घराण्यातील असूनही आश्रमात रहायला येणे’, हे आजच्या युगात कौतुकास्पदच आहे’, असे मला वाटते; कारण मनुष्याला बंगला, गाडी, पैसा आदी गोष्टींचा मोह कधीही सुटत नाही आणि या मोहमायेमुळे मनुष्याचा पाय चिखलात रुतल्याप्रमाणे होतो. तो त्यातून कधीही बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे तो साधनेपासून दुरावतो. काकूंवर गुरुकृपा असल्यामुळे त्या प्रपंचातून बाहेर पडू शकल्या. आश्रमजीवन जगण्यास तसे पुष्कळ अवघड असते; कारण साधकाचा सतत मनोलय होत असतो. काकू मात्र आश्रमजीवनात सहजतेने समरस झाल्या. आश्रमात सर्व साधकांशी त्या प्रेमाने वागत असत.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शब्दांवर दृढ विश्वास ठेवून प्रयत्न करणार्‍या देवलकाकू लवकरच संतपदी विराजमान होतील !

काकू व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. टंकलेखन शिकता शिकता त्या अंतिम संकलन सेवेपर्यंत पोचल्या होत्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शब्दांवर दृढ विश्वास ठेवून प्रयत्न केल्यामुळे त्या अंतिम संकलन सेवेपर्यंत पोचल्या. लवकरच त्या ‘संतपदी विराजमान होतील’, असे मला वाटते. आश्रमात राहिल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले. ईश्वराधीन मृत्यू असला, तरी ‘एक चांगला संकलक गमावला’, असे मला वाटले.

देवलकाकूंनी आपल्याला एक उत्तम शिकवण दिली आहे. काकूंचे हे सर्व गुण आपण सर्व साधकांनी आत्मसात करूया. हीच काकूंप्रती कृतज्ञता ठरेल.’

– (पू.) सौ. शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या संत, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा. (११.७.२०२४)

९. आईचा कृतज्ञताभाव

१२.७.२०२४ या दिवशी मला निरोप मिळाला की, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भेट होणार आहे. त्या आधी नामजपाला बसले असतांना मी मनातून आईला विचारले, ‘आई, तुला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांना काही सांगायचे आहे का ?’ तेव्हा मला असे दिसले की, आईची पुष्कळ भावजागृती झाली आणि ती म्हणाली, ‘काही नाही, केवळ ‘कृतज्ञता’ असे सांग.’

‘असे साधक’, ‘असा आश्रम’ आणि ‘असे गुरुदेव’ जगाच्या पाठीवर कुठेही शोधूनसुद्धा सापडणार नाहीत. गुरुदेव आणि साधक यांनी आमच्यासाठी जे काही केले, त्यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपूर्णच आहे.

‘निरपेक्ष प्रेम करणारी आणि आम्हाला साधनेत साहाय्य करणारी आई मिळणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची आमच्यावरील अनंत कृपा आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. राजलक्ष्मी अमित जेरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४४ वर्षे), सॅन डिएगो, अमेरिका. (१३.७.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक