हे अधिवेशन निर्धार आणि विजय निश्चित करणारे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – सरकारसाठी हे अधिवेशन निरोपाचे नसून ते राज्याच्या विकासाचा निर्धार करणारे आणि पुढील निवडणुकीमध्ये विजय निश्चित करणारे अधिवेशन आहे. हे निवडणुकीसाठी गाजर नाही, तर गजर आहे, असे प्रतिउत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले. ते विधान परिषदेतून निवृत्त झालेल्या सदस्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी बोलत होते.
सरकारने आतापर्यंतच्या घोषणांच्या पूर्ततेविषयी श्वेतपत्रिका जाहीर करावी ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
मुंबई – सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतीवृष्टी, थापांचा महापूर आहे. सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा हा एक खोटा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत हे खोटे नॅरेटिव्ह (कथानक) आहे. या योजनांसाठी आर्थिक प्रावधान कसे करणार ? याचा त्यात कुठेही उल्लेख नाही. त्यांनी आजपर्यंत ज्या घोषणा केल्या, त्यातील किती पूर्ण झाल्या ? यावर तज्ञांची समिती नेमून विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, असे मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व्यक्त केले.
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची पूर्ती करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ! – अजित पवार, अर्थमंत्री
मुंबई, २८ जून (वार्ता.) – अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची पूर्ती करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. जे झेपेल तितकेच घोषित केले आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘राज्यात दरडोई उत्पन्न वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. राज्यावरील कर्ज हे ३ टक्क्यांच्या मर्यादेत आहे’, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा निवडणुकीचा नव्हे, तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. विधीमंडळात अर्थसंकल्प सादर झाल्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात ते बोलत होते.