देहू (पुणे) येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान !

‘ग्यानबा तुकाराम’च्या नाजगजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात देहू दुमदुमले !

देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यातील आकर्षक छत्री

देहू (जिल्हा पुणे) – ‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या नामगजराने अवघा देऊळवाडा परिसर दुमदुमून गेला होता. पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. तेथे आरती आणि कीर्तन होईल. या पालखो सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भाविक देहूमध्ये आले आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका असलेली पालखी

उत्साहात पार पडला पालखी सोहळा !

संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. प्रथेप्रमाणे प्रस्थानापूर्वी पहाटे ५ वाजता श्रीविठ्ठल-रखुमाई मंदिरात आणि शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी इनामदार वाड्यात आली. तेथे दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत् पूजा करण्यात आली. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर आणि इनामदार वाड्यातून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मानकरी गंगा म्हसलेकर यांच्या कह्यात देण्यात आल्या. म्हातारबा दिंडीसह या पादुका डोक्यावर घेऊन टाळ-मृदंगाच्या तालावर मुख्य मंदिरात आणण्यात आल्या.

पावसातही वारकर्‍यांचा उत्साह कायम !

२८ जूनला सकाळपासून अधून-मधून येणार्‍या पावसाच्या हलक्या सरी आनंदाने अंगावर घेत उत्साही, आनंदी आणि भक्तीमय वातावरणात वैष्णवांचे दैवत असलेल्या श्री पांडुरंगाच्या भेटीला वारकरी अन् भाविक उत्साहाने मार्गस्थ झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, विणेचा मधूर नाद आणि मुखी नामगजर असलेले वारकरी फुगड्या खेळत आनंद व्यक्त करत होते. ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल.