कलाकार विद्यार्थ्यांनो, संगीत हा ठराविक मुदतीचा अभ्यासक्रम नसून ती निरंतर करायची साधना आहे !

‘वसई रोड, मुंबई येथील श्री. संदीप तुळसकर यांनी अनेक मान्यवर गुरूंकडे १० वर्षे तबलावादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध कार्यक्रमांत तबल्याची साथसंगतही केली आहे. ते अनेक विद्यार्थ्यांना २५ वर्षांपासून तबलावादनाचे शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. ‘सध्याच्या विद्यार्थी कलाकारांची मानसिकता, विद्यार्थी कलाकारांचा पाश्चात्त्य संगीताकडे असलेला कल आणि खरे संगीत’ या विषयांवरचे त्यांचे विचार येथे दिले आहेत.

१. जनमानसात भारतीय संगीताविषयी असलेल्या संकुचित कल्पना

सर्वसाधारणपणे जनमानसात भारतीय संगीताच्या संदर्भात ‘संगीत ही मनाला निखळ आनंद देणारी अनुभूती’ अशी कल्पना आहे; मात्र ‘खरे संगीत कोणते ?’, याविषयी अनेक जण अनभिज्ञ आहेत. काही व्यक्तींच्या मते ‘संगीत हे केवळ मनोरंजनाचे आणि करमणुकीचे साधन आहे’, इतकीच संगीताची व्याप्ती आहे.

२. नादब्रह्म असलेल्या संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेण्याविषयी विद्यार्थ्यांची लक्षात आलेली उदासीनता

श्री. संदीप तुळसकर

संगीत ‘नादब्रह्म’ आहे. नादब्रह्मापर्यंत पोचण्याचा संगीत हा मार्ग आहे. ‘गायन, वादन आणि नृत्य’ यांच्या आविष्काराला ‘संगीत’ म्हणतात; मात्र सध्या संगीतक्षेत्रात अशुद्धी आणि संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली उदासीनता निदर्शनास येते. याची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत,

अ. ‘काही विद्यार्थी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संगीताची कास धरतात.

आ. विद्यार्थ्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा रियाज किंवा सराव करणे अपेक्षित असते. अनेक विद्यार्थी सराव करण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे ‘संगीताचा रियाज किंवा सराव करणे’ (टीप) ही संकल्पना मागे पडत आहे.

(टीप – संगीत सराव : ‘गायन, वादन, नृत्य’ यांचा शास्त्रोक्त पद्धतीने नियमित दिवसभरातील विशिष्ट घंटे सराव करणे’, याला ‘संगीताचा सराव करणे’, असे म्हणतात.)

इ. ‘शास्त्रीय गायन’ हा कंठ संगीताचा (टीप) पाया आहे; मात्र ‘रागदारी संगीता’चे अध्ययन करण्याकडे तरुणांचा कल अत्यल्प आहे.

(टीप – कंठ संगीत : गायनालाच ‘कंठ संगीत’ असे म्हणतात.)

ई. सध्या बहुतांश कलाकार विद्यार्थ्यांना अल्प कालावधीत सिद्ध होण्याची अपेक्षा असते. त्यांचा ‘मला किती दिवसांत संगीतकला आकलन होईल ?’, हा पहिला प्रश्न असतो.’

३. संगीत साधना ‘अध्ययन, ध्यास आणि गुरुकृपा’ यांच्या आधारावर टिकून असते !

अ. संगीत हा असा अभ्यासक्रम नाही की, जो ठराविक कालावधीत पूर्ण होईल. ती एक साधना आहे.

आ. महासागरात ज्याप्रमाणे जल आहे, त्याचप्रमाणे संगीत हे संगीतरूपी ज्ञानाच्या जलाशयाने भरलेला महासागर आहे. यातून तुम्ही कितीही जल घेतले, तरीही महासागर आटणार नाही.

इ. ज्या क्षणी ‘ज्ञानार्जन पूर्ण झाले’, ही भावना आपल्या मनाला शिवेल, त्या क्षणी आपल्यामध्ये अहंकार वाढीस लागेल आणि आपण ज्ञानार्जन करण्यापासून दूर जाऊ. असे शिष्य कालांतराने निष्प्रभ होतात.

ई. संगीत साधना ही ‘अध्ययन, ध्यास आणि गुरुकृपा’ यांच्या आधारावर टिकून असते.

४. भारतीय शास्त्रीय संगीताची महानता स्वर साधनेच्या प्रक्रियेवर आधारित आहे !

भारतीय शास्त्रीय संगीताची महानता स्वर साधनेच्या प्रक्रियेवर आधारित आहे. कंठातून स्वर निघत असतांना स्वर स्थिर रहाणे, स्वर खंडित किंवा कंपित न होणे, हे अतिशय महत्त्वपूर्ण सूत्र आहे, जे भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे.

५. भारतीय कलाकारांवर, तसेच जनमानसावर ‘रॅप’सारख्या पाश्चात्त्य संगीताचा असलेला प्रभाव

सध्या भारतीय कलाकार विद्यार्थ्यांवर, तसेच जनमानसावर ‘रॅप’सारख्या पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव अधिक प्रमाणात आहे. या प्रकारात शब्दाचा शब्दाशी, वाक्याचा वाक्याशी काहीही संबंध नसतो. अश्लील शब्दप्रयोग आणि हिडिस अंगविक्षेप करणे, ही या प्रकाराची वैशिष्ट्ये आहेत. असे संगीत हे सण आणि उत्सव या कालावधीत प्रकर्षाने वाजवले जाते अन् त्यावर अंदाधुंद नृत्यही केले जाते. अशा प्रकारच्या संगीताकडे तरुण पिढी आकर्षिली जात आहे.

६. पाश्चात्त्य गानप्रकारांच्या श्रवणापेक्षा आध्यात्मिक भजने, प्रासादिक अभंग आणि सात्त्विक भक्तीगीते यांचे कर्णसुसह्य आवाजात श्रवण केल्यास सकारात्मक दिव्य चेतनेची अनुभूती आपल्याला येते.

७. संगीतप्रेमी रसिकांचे दायित्व !

‘भारतीय संगीत’ हा समाजजीवनाचा आरसा आहे. ‘आपली भावी युवा पिढी आदर्शवादी, चारित्र्यवान आणि सुसंस्कृत व्हावी’, असे आपल्याला मनापासून वाटत असेल, तर ‘सर्व संगीतप्रेमी रसिकांनी भारतीय संगीताची कास धरून मनाला उद्विग्न करणारे संस्कृतीशून्य अपप्रकार, संगीत क्षेत्रातील अशुद्धी थांबवणे’, हे सर्वांचे कर्तव्य आहे.’

– श्री. संदीप तुळसकर, तबलावादक, संगीत प्रशिक्षक, वसई रोड (पश्चिम), मुंबई. (२९.५.२०२४)