रत्नागिरी – इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटी आणि रत्नागिरी सीए ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोफेशनल इथिक्स आणि प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ यावर एक दिवसाचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित या मार्गदर्शन सत्राला ५१ सीए उपस्थित होते.
पहिल्या सत्रात सीए इन्स्टिटयूटच्या सेंट्रल कौन्सिलचे मेंबर आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी ‘कोड ऑफ इथिक्स आणि सीएंनी सर्टिफिकेशन करतांना घ्यायची काळजी’ यावर मार्गदर्शन केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या डिसीप्लिनरी कमिटीच्या विविध निर्णयांचा या वेळी सीए किनरे यांनी सविस्तर आढावा घेतला. सीएसाठी येणार्या काळातील नवीन व्यावसायिक संधी याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुसर्या सत्रात इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए मंगेश घाणेकर यांनी ‘रेरा सर्टिफिकेशन’ यावर मार्गदर्शन करतांना रेरा कायद्यांतर्गत द्याव्या लागणार्या विविध सर्टिफिकेशन फॉर्म्सचे विश्लेषण केले. बांधकाम व्यावसायिकांसाठी निवासी सदनिका प्रकल्पांचे रेरा सर्टिफिकेट्स देतांना फॉर्म ३ हा चार्टर्ड अकाउंटंट्सनी द्यायचा फॉर्म आहे. यात माहिती देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी त्यांनी सखोल विवेचन केले.
दुपारनंतरच्या सत्रात सीए मंदार गाडगीळ यांनी आयकर कायद्यांतर्गत विवरणपत्र दाखल करतांना वैयक्तिक नोकरदार, तसेच व्यावसायिकांसाठी असणार्या विविध विवरण पत्रांच्या फॉर्म्ससंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. विवरणपत्रात अचूक माहिती भरणे, तसेच योग्य फॉर्म भरणे, हे पुष्कळ महत्त्वाचे असते. चालू आर्थिक वर्षासाठी विवरण पत्रात असलेले पालट येथे सीए गाडगीळ यांनी विशद केले.
रत्नागिरी सीए ब्रँच अध्यक्षा सीए अभिलाषा मुळये यांनी प्रास्ताविक केले. सीए कपिल लिमये यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी ब्रँच उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, सचिव सीए केदार करंबेळकर, कोषाध्यक्ष आणि पश्चिम भारत सीए विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए अक्षय जोशी, माजी अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, समिती सदस्य सीए प्रसाद आचरेकर उपस्थित होते.