मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील ज्या ठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे अथवा अंतिम टप्प्यात आहे, अशा ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम चालू झाले आहे. सद्य:स्थितीत बावनदी ते वाकेड ठिकाणच्या रस्त्याच्या दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता केली जात आहे. या पावसाळ्यात महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आले आहेत, तसेच महामार्गाच्या दुतर्फा देशी वाणाचेच वृक्ष लावण्यात यावेत, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.

लवकरच या वृक्ष लागवडीसाठी ताम्हण, कदंब, कांचन, आवळा, अर्जुन, आपटा, महोगनी, पिंपळ, जांभूळ यांसारख्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, तसेच रोपवाटिकेतून एक वर्षापेक्षा अधिक वय असणारी झाडे आणण्यात येणार आहेत. इथल्या माती आणि हवामान यांची सवय होण्यासाठी महिनाभर ही झाडे आधी आणण्यात येणार आहेत. चालू असलेल्या पावसाळ्यातच ही लागवड करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !