विजयवाडा (आंध्रप्रदेश) – नुकत्याच पार पडलेल्या आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत एन्. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने (‘टीडीपी’ने) बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत ‘टीडीपी’ने ‘जनसेना पार्टी’ आणि ‘भाजप’ यांच्याशी युती केली होती. राज्यात या युतीचे सरकार स्थापन झाले असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासमवेत ‘जनसेना पार्टी’चे प्रमुख अभिनेते पवन कल्याण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विजयवाडा येथील गन्नावरम् विमानतळाजवळ ‘केसरपल्ली आयटी पार्क’ येथे १२ जूनला सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते.
युतीला १७५ पैकी १६४ जागा !
विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या, तर पवन कल्याण यांच्या ‘जनसेना पार्टी’ने २१ जागांवर विजय मिळवला. यासह भाजपने ८ जागा जिंकल्या. तिन्ही पक्षांनी मिळून, म्हणजेच युतीने राज्यात १६४ जागा जिंकल्या, तर जगन मोहन रेड्डींच्या वाय.एस्.आर्. काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या.