समाजकल्याण विभागाच्या अधिकारी सपना घोळवे यांना सांगली येथे लाच घेतांना अटक !

सांगली, ६ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील एका निवासी शाळेसाठी मान्य केलेल्या अनुदानाच्या १० टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी करून त्यातील १ लाख रुपये घेतांना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगली येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील साहाय्यक संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार्‍या सपना सुखदेव घोळवे (वय ४० वर्षे) या ‘वर्ग १’च्या अधिकारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ जून या दिवशी अटक केली.

याच प्रकरणात येथील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील (वय ३६ वर्षे) यांनी आश्रमशाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० सहस्र रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा नोंद करून पथकाने त्यांना  अटक केली आहे. ‘कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवा’, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीच अजून लाच घेत असतील, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?

  • भ्रष्टाचाराने पोखरलेला समाजकल्याण विभाग !

  • भरघोस वेतन असतांनाही लाच घेणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करून कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !