वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन प्रभातच्या नियतकालिकांविषयी माहिती जाणून घेतांना डावीकडे श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड आणि त्यांना माहिती देतांना उजवीकडे श्री. योगेश जलतारे

रामनाथी (गोवा) – वाराणसीतील सुप्रसिद्ध श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी ६ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि हिंदु धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील कार्य आस्थेने जाणून घेतले आणि कार्याला आशीर्वाद दिले. या वेळी तेथे उपस्थित असलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांना पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि सनातनचे ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यासह श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यासमवेत आलेले पुरोहित सर्वश्री गौरव घैसास, सारंग घैसास, प्रथम जोशी आणि अमोल पाध्ये यांचाही सन्मान श्री. रमेश शिंदे यांनी केला.

श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा संदेश

श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड

या वेळी श्री. गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी त्यांच्या संदेशात म्हटले, ‘‘आपले बोलणे मधूर असणे, दया दाखवणे, दान करणे, गरिबांचे रक्षण करणे आणि सत्संगात रहाणे या ५ गोष्टी प्रत्येकाने आचरणात आणल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्यातील दोष दूर होऊन आपल्या अंगी चांगले गुण येतील आणि हिंदुत्वाची प्रतिष्ठापना होईल.’’

अयोध्येतील श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेचा काढला होता मुहूर्त !

श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीराममंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे संचलन केले होते. २२ जानेवारी २०२४ या दिवशी झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्तही त्यांनी काढला होता.