Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसर्‍यांदा अंतराळ मोहिमेवर !

यापूर्वी वर्ष २००६ आणि २०१२ मध्ये अंतराळ मोहिमेत होता सहभाग

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स

वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी इतिहास रचला आहे. सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या एका सहकार्‍यासह तिसर्‍यांदा अवकाशात झेप घेतली आहे. सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमेला ५ जून या दिवशी फ्लोरिडामधील केप कॅनवेरल ‘स्पेस स्टेशन’वरून प्रारंभ झाला. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून २२ मिनिटांनी ही मोहीम चालू झाली. बोईंग स्टारलाइनरचे हे विमान ६ जून या दिवशी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोचेल. या मोहिमेत विल्यम्सच्या सहकारी बुच विल्मोर समवेत आहेत.

१. सुनीता विल्यम्स अशा मोहिमेवर जाणार्‍या जगातील पहिली महिला अंतराळवीर ठरल्या आहेत.

२. मे १९८७ मध्ये सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकेच्या नेव्हल अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर त्या अमेरिकन नौदलात रुजू झाल्या. वर्ष १९९८ मध्ये त्यांची नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली. यापूर्वी सुनीता विल्यम्स वर्ष २००६ आणि २०१२ मध्ये अंतराळ मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.