US Congratulates Indians : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमेरिकेने केले भारतियांचे अभिनंदन

निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा फेटाळला !

वॉशिंग्टन (अमेरिका) – लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. निकाल घोषित झाल्यानंतर अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत यशस्वीपणे सहभागी होऊन ती संपवल्याबद्दल अमेरिकेने भारत सरकारचे कौतुक केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी या निवडणुकीतील परकीय शक्तींच्या हस्तक्षेपाचे आरोप फेटाळून लावले.

१. मॅथ्यू मिलर म्हणाले की, अमेरिकेच्या वतीने ही लोकसभा निवडणूक यशस्वीपणे सहभागी करून संपवल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि मतदार यांचे आभार मानतो. आम्ही अंतिम निकाल पहाण्यासाठी उत्सुक आहोत.

२. लोकसभा निवडणुकीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना मिलर म्हणाले की, मी या निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्यांविषयी भाष्य करणार नाही. आम्ही ६ आठवड्यांत जे पाहिले ती लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत मोठी कसरत होती.

३. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांच्या भारतीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेपाच्या वृत्ताचे खंडण करतांना मिलर म्हणाले की, आम्ही नेहमीच आमची मते स्पष्टपणे व्यक्त करू. आम्ही आमची मते परदेशातील सरकारांसमवेत खासगीपणे मांडतो. जेव्हा आम्हाला ज्या गोष्टींची चिंता असते, तेव्हा आम्ही ती सार्वजनिकपणे व्यक्त करतो. मीही तेच केले. भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे.