सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही न केल्यास निवडणुकीला सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील

पुणे – सरकारने सगेसोयर्‍यांच्या सूत्राची कार्यवाही करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही, तर आपण विधानसभा निवडणुकीला सर्वच २८८ जागांवर उमेदवार उभे करणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वर्ष २०१३ मधील फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक वॉरंट जारी झाले होते. या प्रकरणी ३१ मे या दिवशी ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित झाले. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट रहित केले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. ‘लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे ४ जूनपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण चालू करणार, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत आपला लढा चालूच राहील’, असे मनोज जरांगे यांनी या वेळी स्पष्ट केले.

काय आहे वर्ष २०१३ चे प्रकरण ?

मनोज जरांगे यांनी ‘शिवबा’ संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या वतीने वर्ष २०१३ मध्ये एका नाटकाचे आयोजन केले होते; पण हे नाटक झाल्यानंतर त्याचे पैसे देण्यात आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात जरांगे यांना यापूर्वीच जामीन संमत झाला होता.