कोल्हापूर, १ जून (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात् ‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन कोल्हापूर आगार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते गाडीचे पूजन करून प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी ‘स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँक लि.’ यांच्या वतीने प्रवाशांना जिलेबी वाटप करण्यात आले. एस्.टी.च्या प्रवेशद्वारात आकर्षक अशी रांगोळी काढली होती, तसेच विविध गाड्यांना फुलांची आरास करून सजवण्यात आले होते. ‘प्रवाशांना चांगली आणि तत्पर सेवा देण्यासाठी ‘एस्.टी.’ नेहमी कटीबद्ध आहे’, असे या प्रसंगी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले. आगार व्यवस्थापक श्री. अनिल म्हेत्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगारातील काही कामगारांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी साहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे, साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी, मच्छिंद्रनाथ डोंगे, सारंग जाधव, सुनील रसाळ, संजीवनी ढोणे, वैशाली पाटील यांसह विविध अधिकारी, चालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. इचलकरंजी आगारातही साखर-पेढे वाटून उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘एस्.टी.’चे कोल्हापूर स्थानक प्रमुख श्री. मल्लेश विभूते म्हणाले, ‘‘मेमध्ये एस्.टी.ने १४ लाख १२ सहस्र किलोमीटर प्रवास केला आणि ५ कोटी ५० लाख ६६ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळवले.’’
या प्रसंगी ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघा’चे संचालक श्री. संजय घाटगे पत्रकारांना माहिती देतांना म्हणाले, ‘‘स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑप बँक लि.’ मुंबई यांच्या वतीने चालक आणि वाहक यांच्या हितासाठी आम्ही काम करत आहोत. राज्यात बँकेच्या ५२ शाखांमधून कारभार चालतो, तर राज्यात बँकेचे ६२ सहस्र सभासद असून कोल्हापूर आणि गडहिंग्लज या ठिकाणी मिळून आमच्याकडे ३ सहस्र ५०० सभासद आहेत. बँकेत २ सहस्र २०० कोटी रुपयांच्या ठेवी असून प्रत्येक ग्राहकाला यापुढील काळात अत्याधुनिक संगणकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या खात्यातील सर्व माहिती त्याच्या भ्रमणभाषवर अद्ययावत् मिळेल.’’
इचलकरंजी येथील शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानकात वर्धापनदिन उत्साहात !
इचलकरंजी – इचलकरंजी आगाराचे पालक अधिकारी तथा विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पूजन करण्यात आले. या वेळी संजय चव्हाण, सागर पाटील यांसह आगारातील पर्यवेक्षक आणि कर्मचारी तसेच प्रवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रवाशांना साखर-पेढे वाटून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.