अन्य धर्मियांच्या अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष करून राष्ट्र-धर्मासाठी अविरत झटणार्या संस्थेवर नाहक आरोप करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी नव्हे का ?
दैनिक ‘लोकसत्ता’मधील ‘श्रद्धा निर्मूलन’ या लेखाविषयी वाचकाचा अभिप्राय वाचून त्या विचारांमागील मांडलेले तथ्य !
१३ मे या दिवशीच्या दैनिक ‘लोकसत्ता’मधील ‘श्रद्धा निर्मूलन’ या लेखाविषयी १७ मेच्या अंकात श्रीकांत पटवर्धन यांचा अभिप्राय वाचला. पटवर्धन यांच्या मते ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३’ हा कायदा झोपडपट्टीत पत्र्याच्या खोलीत जारणमारण, वशीकरण, भूतप्रेत बाधा निवारण, अपत्यप्राप्ती, गुप्तधन यांसारख्या गोष्टींत भोळ्याभाबड्या लोकांना फसवून पैसे उकळणार्या बंगालीबाबा किंवा फकीर यांच्यासाठी बनवला नसून त्याचा आवाका मोठा आहे. त्याचे विवेचन करतांना या कायद्यातील एका कलमाचा संदर्भही त्यांनी दिला आहे. ज्यानुसार ‘स्वतःमध्ये अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून लोकांना चकित करणे, स्वतःच्या आज्ञा न पाळल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील, असे भासवून लोकांना भयभीत करणे, स्वतः भगवंताचा अवतार असल्याचे भासवून लोकांना प्रभावित करणे इत्यादी गोष्टी या कलमानुसार गुन्हा ठरतील आणि संबंधितांवर या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते’, असे त्यात म्हटले आहे.
सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत चालणारे उपक्रम, संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि नियतकालिके यांतील लिखाण या कलमाच्या, पर्यायाने या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा असल्याचेही या ठिकाणी मांडले आहे. पटवर्धन यांचे लिखाण वाचल्यावर लक्षात आलेली महत्त्वाची सूत्रे येथे देत आहे.
१. सनातन संस्थेला गोवण्यासाठी कायद्यातील एक कलम पुरेसे असतांना इतका खटाटोप का ?
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर १० मे या दिवशी सनातन संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात संस्थेला अपकीर्त करण्यासाठी जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप केला आहे. पटवर्धन यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३’च्या केलेल्या अभ्यासावरून लक्षात येते की, सनातन संस्थेला गोवण्यासाठी या कायद्यातील एक कलमच पुरेसे होते, मग एवढा सर्व खटाटोप कशासाठी ? या एका कलमाच्या आधारे सनातन संस्थेवर कारवाई करणे सहज शक्य होते.
२. बंगालीबाबा किंवा फकीर यांच्यावर लगाम घालण्यासाठीच कायद्याची आखणी केली असल्याचे नावातून स्पष्ट !
पटवर्धन ज्या कायद्याचा उल्लेख ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३’ असा करतात, त्या कायद्याचे नाव ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याविषयी, तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याविषयी अधिनियम २०१३’ असे आहे. त्यामुळे झोपडपट्टीत पत्र्याच्या खोलीत वर उल्लेख केलेल्या गोष्टी करून लोकांची फसवणूक करणारे बंगालीबाबा किंवा फकीर यांच्यावर प्रामुख्याने लगाम घालण्यासाठीच या कायद्याची आखणी केली आहे, हे स्पष्ट होते. याचा उल्लेखही कायद्याच्या नावातच करण्यात आलेला आहे.
३. कायद्यातील कलम सनातनला अपकीर्त करण्यासाठी केले असल्याचे अंनिसच्या लक्षात कसे आले नाही ?
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातनच्या आश्रमांना वैद्यकीय साहाय्य पुरवणारे डॉ. वीरेंद्रसिह तावडे यांच्यासह सनातनचे अकोलकर आणि पवार या दोन साधकांची नावे पुढे आली. मग मागचा-पुढचा विचार न करता ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या संधीचा अपलाभ घेऊन तावडे, अकोलकर आणि पवार यांच्या छायाचित्रांसह ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावून सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. (प्रत्यक्षात या प्रकरणी अंदुरे आणि कळसकर यांना शिक्षा झाली आहे.) त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आपणच केलेल्या कायद्यामध्ये एक कलम सनातनला गोवण्यासाठी आणि अपकीर्त करण्यासाठी पुरेसे असल्याचे आजतागायत लक्षातच आले नाही का ? हा प्रश्न पटवर्धन यांचे पत्र वाचल्यावर मनाला पडला.
४. अधिवक्ते सूज्ञ आहेत, हे पटवर्धन यांनी लक्षात घ्यावे !
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या साधकांची नावे जेव्हा समोर आली, तेव्हा त्यांचे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करण्यासाठी अधिवक्त्यांचा मोठा फौजफाटा उभा राहिला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालाच्या वेळी हे सर्वांनीच पहिले. अधिवक्त्यांच्या चमूला पटवर्धन यांनी लक्षात आणून दिलेल्या कलमाविषयी माहिती नसेल का ?
५. जादूटोणाविरोधी कायद्याचा सखोल अभ्यास करणारी सनातन संस्था एकमेव !
वर्ष २०१३ च्या आधी कित्येक वर्षांपासून डॉ. दाभोलकर हे राज्यात जादूटोणाविरोधी कायदा आणण्याच्या प्रयत्नात होते, तर सनातन संस्थेने अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या साहाय्याने कायद्यातील त्रुटी वेळोवेळी मंत्रीमंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. परिणामी राज्य विधिमंडळाची अधिवेशनावर अधिवेशने होत होती; मात्र कायदा पारित होण्याचे नाव घेत नव्हता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह सनातन संस्थेने कायद्याच्या मसुद्याच्या केलेल्या सखोल अभ्यासामुळे या कायद्यातील २८ कलमांपैकी १७ कलमे तत्कालीन सरकारला वगळावी लागली होती. त्यामुळे या कायद्याचा जितका अभ्यास सनातनने केला आहे, तितका अभ्यास क्वचितच कुणी केला असेल !
६. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या चांगल्या कार्याकडे दुर्लक्ष नको !
खून आणि बलात्कार यांसारख्या कथित गुन्ह्यांच्या प्रकरणी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करण्यात आलेली असली, तरी त्यांनी याआधी समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी केलेल्या कामांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? समाजामध्ये राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे, ज्याविषयी समाजातील अधिकांश वर्गाला आजही आदर आहे.
७. ‘भाव तिथे देव’ ही उक्ती कायद्यानुसार गुन्हा ठरते का ? याचा अभ्यास पटवर्धन यांनी करावा !
मी स्वतः ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून वाचक आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्यातील अतींद्रिय चमत्कारिक शक्तीचा उल्लेख केल्याचे ‘सनातन प्रभात’मधून आजतागायत कधीही माझ्या वाचनात आलेले नाही. ‘साधना केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती या साधकांच्या देवाप्रतीच्या भावामुळे आलेल्या असतात’, असा स्पष्ट उल्लेख ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या अनुभूतीखाली करण्यात आलेला असतो. ‘भाव तिथे देव’ ही उक्ती गेल्या शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. मग ती उक्तीही या कायद्यानुसार गुन्हा ठरते का ? याचाही अभ्यास पटवर्धन यांना करावा लागेल !
८. छद्मवैज्ञानिक पद्धतीद्वारे नव्हे, तर शास्त्रीय भाषेत अध्यात्म मांडून लोकांना साधनेला प्रवृत्त करणारी सनातन संस्था एकमेव !
ज्या पद्धतीचा उल्लेख पटवर्धन छद्मवैज्ञानिक पद्धत असा करतात, त्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’चा शोध आधुनिक विज्ञानाने लावला आहे. वस्तूतून किंवा व्यक्तीतून प्रक्षेपित होणारी सकारात्मक-नकारात्मक स्पंदने, ऊर्जेची किरणे यांचे प्रमाण मोजण्यासाठी या यंत्राचा जगभरात वापर केला जात आहे. सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत. अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक परिभाषेत मांडून लोकांना साधनेला प्रवृत्त करणारी सनातन ही एकमेव संस्था असावी. मनातील प्रश्नांची उकल शास्त्रीय परिभाषेत झाल्याने आज अनेक उच्च विद्याविभूषित आधुनिक वैद्य शास्त्रज्ञ, अधिवक्ता, अभियंते, शिक्षक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत आणि अध्यात्मातील आनंद उपभोगत आहेत.
९. पटवर्धन यांचे हास्यास्पद आव्हान !
सनातनची प्रकाशने अंधश्रद्धेचा प्रसार करतात, गुन्हा सिद्ध करण्यासाठी हवे तेवढे पुरावे सनातनच्या छापील साहित्यातून उपलब्ध असल्याचे पटवर्धन लिहितात. ‘या पुराव्यांच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सनातनवर गुन्हा नोंदवावा’, असे आवाहन त्यांनी लिखाणात केले आहे. ज्या समितीने हा कायदा बनवला, त्याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या कायद्यान्वये सनातन संस्थेवर गुन्हा नोंदवण्यासाठी आव्हान करणे हास्यास्पद नव्हे का ?
१०. पटवर्धन यांनी सनातनच्या संकेतस्थळाला भेट दिल्यास त्यांचे शंकानिरसन होईल !
पटवर्धन यांनी या पत्रात केलेले लिखाण हे त्यांना मिळालेल्या अर्धवट आणि अपुर्या माहितीच्या आधारावर केलेले दिसत आहे. सनातन संस्थेविषयी आणि तिच्या आध्यात्मिक अन् सेवाभावी उपक्रमांविषयी खर्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल, तर सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. पटवर्धन यांच्या सर्व शंकांचे निरसन यातून होईल, याची निश्चिती वाटते.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (२१.५.२०२४)