शीतपेय देऊन बेशुद्ध करून केला बलात्कार !
नवी देहली – राष्ट्रीय राजधानी देहलीतील गीता कॉलनी भागात २५ वर्षांच्या महिलेवर रिक्षाचालक महंमद ओमर याने बलात्कार केला. ओमरने त्याच्या रिक्षातून प्रवास करणार्या महिलेला मादक पदार्थ काऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ओमर याला अटक केली आहे.
पोलीस आयुक्त (उत्तर देहली) मनोज कुमार मीना म्हणाले की, २६ मे या दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लूट संबंधी दूरभाष आला. तक्रारीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोचले, तेव्हा पीडित महिला घायाळ अवस्थेत होती आणि तिला रक्तस्राव होत होता. त्या महिलेच्या शेजारी तिचा तीन वर्षांचा मुलगा होता. पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात भरती केले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले.
पीडित महिलेची परिस्थिती सुधारल्यानंतर तिने पोलिसांना माहिती सांगितली.
तिने सांगितले की, ती बिहारची रहिवासी असून पंजाबला तिच्या नवर्याला भेटण्यासाठी जात होती. २६ मे या दिवशी ती नवी देहली रेल्वे स्थानकावर उतरली आणि सदर बाजारात गेली. परत येत असतांना तिने ई-रिक्षा केली. तेव्हा रिक्षाचालकाने तिला प्यायला थंडपेय दिले. थंडपेय प्यायल्यावर ती बेशुद्ध पडली. यानंतर आरोपीने त्या महिलेला निर्जन भागात नेले. त्याने प्रथम तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती महिला शुद्धीवर येऊ लागली, तेव्हा त्या महिलेने त्याला विरोध केला. यावर आरोपीने त्या महिलेला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावर वीट मारली. ती महिला पुन्हा बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर तिला आढळले की, तिचा भ्रमणभाष आणि ३ सहस्र रुपये रोख गहाळ आहेत.
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अन्वेषण चालू केले. अनुमाने ५०० सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर ई-रिक्षाची ओळख पटली आणि आरोपीचे नाव कळाले. यानंतर शोधमोहीम हाती घेऊन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक ओमरला कह्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामहिलांसाठी देशाची राजधानी असुरक्षित असणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! |