परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करणारे अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

१६.५.२०२४ या दिवशी अकोला येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्यामसुंदर राजंदेकर (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. (कै.) राजंदेकर हे सनातनच्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांचे लहान भाऊ आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचे आजोबा (वडिलांचे काका) होते. २८.५.२०२४ या दिवशी (कै.) राजंदेकर यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. श्याम राजंदेकर

१. बहिणीला कामात साहाय्य करणे : ‘आमची आई लहानपणीच वारल्याने आम्ही सर्व भावंडे वडिलांच्या समवेत एकत्र रहात होतो. तेव्हा माझा भाऊ श्याम वयाने लहान होता, तरीही तो घरातील सर्व कामांमध्ये मला साहाय्य करायचा.

२. बहिणीच्या पहिल्या दिवाळसणाची सिद्धता करणे आणि त्यानंतर प्रत्येक दिवाळीला तिला भेटण्यासाठी जाणे : मी लग्न होऊन सासरी गेले. त्यानंतर मी जेव्हा पहिल्या दिवाळसणाला घरी आले, तेव्हा श्यामने फराळाचे पदार्थ बनवण्यापासून दिवाळसणाची सर्व सिद्धता स्वतः करून ठेवली होती. त्यानंतर प्रत्येक दिवाळीला माझ्या तीनही भावांपैकी ((विनायक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८० वर्षे), श्याम (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७८ वर्षे) आणि विष्णु यांच्यापैकी) कोणीतरी एक जण मला नियमितपणे माहेरी न्यायला येत असे. वडील वारल्यानंतर माझे माहेरी जाणे अल्प झाले. त्या वेळी तीनही भावंडे क्रमाक्रमाने मला दिवाळीला येऊन भेटत असत. यांमध्ये कोणीही कधीही कुचराई केली नाही.

पू. कुसुम जलतारे

३. अन्यायाविरुद्ध लढा देणे : श्याममध्ये पूर्वीपासूनच अन्याय आणि चुकीच्या गोष्टी यांविषयी चीड होती. एकदा तो ज्या मालगाडीवर ‘गार्ड’ (टीप) म्हणून सेवारत होता, त्या गाडीच्या चालकाने अतिवेगाने गाडी चालवली. त्या वेळी गाडीचा चालक दारूच्या नशेत होता. तो गुंड प्रवृत्तीचा आणि धर्मांध होता, तरीही श्यामने निर्भयपणे त्याची तक्रार रेल्वे खात्याकडे केली. अगदी निवृत्त झाल्यानंतरही श्यामचा हा लढा चालू होता. त्याने संबंधित व्यक्तीला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला. या सर्व प्रसंगात त्या गुंड व्यक्तीने ‘विविध प्रलोभने दाखवणे, धमकावणे’, असे सर्व प्रकार केले; परंतु श्यामने माघार घेतली नाही.

टीप – गार्ड : आगगाडीतील प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुव्यवस्थित प्रवासाचे दायित्व असणारा रेल्वे खात्यातील एक महत्त्वपूर्ण कर्मचारी.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करणे : सनातनच्या आरंभीच्या काळात श्यामकडे अर्पण गोळा करून ते जमा करण्याची सेवा होती. त्या वेळी एकदा त्याच्या मनामध्ये शंका आली, ‘अर्पण गोळा झाल्यानंतर एखाद्या दिवशी घरामध्ये चोरी झाली किंवा अर्पणाची रक्कम पोचवतांना जर कोणी दरोडा घातला, तर माझ्यावर चोरीचा आळ येईल का ?’ त्या वेळी त्याने ही शंका परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बोलून दाखवली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर श्यामला म्हणाले, ‘‘असे कधीच होणार नाही आणि ज्या दिवशी होईल, त्या दिवशी तुम्ही केवळ मला येऊन सांगा. मी पुढचे बघीन.’’

५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मोठ्या अपघातातून वाचणे : एकदा श्याम सेवेसाठी मुंबई येथील सनातनच्या सेवाकेंद्रात गेला होता आणि रात्री परत आपल्या गावी येणार होता. तो आश्रमातून निघताक्षणी परात्पर गुरु डॉक्टरांनी २ – ३ साधकांना विचारले, ‘‘राजंदेकर गेले का ?’’ त्या वेळी साधकांनी त्यांना ‘हो’ म्हणून सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी श्यामला परत सेवाकेंद्रात बोलवायला सांगितले; परंतु तोपर्यंत श्याम आगगाडी स्थानकावर पोचल्याने वेळ निघून गेली होती. त्यानंतर अकस्मात् श्यामला आगगाडी स्थानकावर परात्पर गुरु डॉक्टर दिसले आणि त्यांनी श्यामला सांगितले, ‘तुमचा मेहुणा पलीकडच्या फलाटावर तुमची वाट पाहत आहे. त्यांना घरी काहीतरी अडचण आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या घरी जा.’ हे ऐकल्यानंतर श्यामने कुठलाही विचार न करता दुसर्‍या फलाटावर जाऊन आपल्या मेहुण्यांना शोधले; परंतु ते न भेटल्याने श्याम थेट त्यांच्या घरी कल्याण (जिल्हा ठाणे) येथे परत गेला. तेव्हा त्याचा मेहुणा म्हणाला, ‘‘मी फलाटावर आलो नव्हतो आणि तुम्हाला शोधतही नव्हतो.’’ तोपर्यंत गाडी सुटल्याने श्यामला मेहुण्यांच्या घरी मुक्काम करण्याविना दुसरा पर्याय नव्हता. त्याच रात्री त्या आगगाडीला मोठा अपघात झाला आणि ज्या डब्यामध्ये श्यामचे आरक्षण होते, त्या डब्याचा चक्काचूर झाला. या प्रसंगात स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांनी श्यामला वाचवले. (‘प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉक्टर त्या वेळी मुंबई सेवाकेंद्रातच होते. श्याम राजंदेकर यांच्या आध्यात्मिक भावामुळे त्यांना वाचवण्यासाठी गुरुतत्त्वाने परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप धारण करून त्यांना प्रवास करण्यापासून परावृत्त केले.’ – संकलक)

६. संतांप्रतीचा भाव : परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मी संतपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच श्यामकडे गेले होते. एरव्हीही मी त्याच्याकडे गेल्यानंतर तो माझे चांगले आदरातिथ्य करायचा; परंतु या वेळी संत म्हणून गेल्यानंतर त्याने माझ्याकडे ‘बहीण’ म्हणून न पहाता ‘संत’ म्हणून पाहिले आणि माझी पाद्यपूजाही केली. त्या वेळी श्यामसाठी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरच तेथे आल्याचे मला जाणवत होते. श्यामच्या या कृतीतून त्याचा सनातनच्या संतांविषयीचा भाव मला शिकायला मिळाला. त्याचा हा भाव सर्वच संतांविषयी होता आणि म्हणूनच परात्पर गुरु डॉक्टरही अकोल्याला गेल्यावर आवर्जून त्याच्याकडे जात असत.

गुरुकृपेने श्यामने कष्टातही आनंदाने दिवस काढले आणि चांगली साधना करून ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ‘त्याची अशीच उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती होत राहो’, ही गुरुचरणी प्रार्थना !’

– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची मोठी बहीण, सनातनच्या ९५ व्या संत, वय ८४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२४)


(कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांच्या आजारपणात त्यांची मुलगी सौ. सुवर्णा प्रवीण खेरडे (रोहा, जिल्हा रायगड) यांना जाणवलेली सूत्रे !

‘१८.५.२०२४ या दिवशी माझे सौ. सुवर्णा प्रवीण खेरडे ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची धाकटी मुलगी आणि माझी नणंद) यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. त्या वेळी त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. रुग्णालयात असतांना गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : सौ. सुवर्णाताई मला म्हणाल्या, ‘‘२९.४.२०२४ या दिवशी बाबांना रुग्णालयात भरती केले. तेव्हा ते पूर्णवेळ नामजप करत होते. त्यांना होणार्‍या शारीरिक त्रासाकडे त्यांचे लक्ष नव्हते. ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानातच होते.

२. वडिलांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे स्मरण करणे आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही त्याच दिवशी त्यांची आठवण येणे : ६.५.२०२४ आणि ७.५.२०२४ या दिवशी बाबा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची आठवण काढत होते. वैद्यकीय अहवालानुसार त्यांच्या शरिरातील सोडियमचे प्रमाण न्यून झाले होते. त्यामुळे त्यांचे असंबद्ध बोलणे अपेक्षित होते; परंतु ते म्हणत होते, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला बोलवत आहेत. त्याच मला बरे करणार आहेत. मला रुग्णालयात ठेवू नका. मला घरी घेऊन चला.’’

१९.५.२०२४ या दिवशी मला (सौ. मानसी राजंदेकर यांना) समजले, ‘वरील २ दिवस श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना श्यामकाकांची पुष्कळ आठवण येत होती. ‘त्यांना काकांशी बोलावे’, असे वाटत होते.

३. शारीरिक त्रास होत असतांनाही वैखरीतून नामजप करणे : सुवर्णाताई पुढे म्हणाल्या, ‘‘७.५.२०२४ या दिवशी दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७.३० या वेळेत बाबा हात जोडून वैखरीतून ‘ॐ, ॐ, ॐ, राम, राम, राम’, हा नामजप आर्ततेने करत होते. या काळात त्यांना तिथे असणार्‍या कोणाचेच त्यांना भान नव्हते.

४. बाबांची सेवा करतांना ‘मी एका उन्नत साधकाची सेवा करत आहे’, असे मला वाटायचे.

५. रुग्णाईत असतांनाही बाबा शांत आणि स्थिर होते.

६. शेवटच्या क्षणी गुरुकृपेने त्यांना काहीही त्रास झाला नाही. त्यांचे प्राण अत्यंत शांतपणे देहातून बाहेर गेले.’’

– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर ((कै.) श्यामसुंदर राजंदेकर यांची सून (पुतण्याची पत्नी), आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (२१.५.२०२४)


अकोला येथील साधकांचा आधार असणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ श्रद्धा असलेले कै. श्याम राजंदेकर (वय ७८ वर्षे) !

अकोला जिल्ह्यातील साधकांना ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. श्याम राजंदेकर यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्रीमती ज्योती पाचडे

१ अ. तत्परता : ‘राजंदेकर कुठलीही वार्ता तत्परतेने सिद्ध करून पाठवत असत.

१ आ. अल्प अहं : त्यांना कुठलीही अडचण आल्यावर ते विचारून घेत असत. ‘मी वयाने यांच्यापेक्षा मोठा असतांना यांना कसे विचारू ?’, असे त्यांना कधी वाटत नसे.

१ इ. श्रद्धा : साधकांनी कुठलीही अडचण सांगितल्यावर ते साधकांना ‘प.पू. डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोला’, असे सांगायचे.’

२. सौ. मेघा वसंत जोशी (वय ६३ वर्षे), अकोला

२ अ. नियमितपणा आणि गांभीर्य : ‘कोरोनाच्या काळात जिल्ह्यात सकाळी कोरोना प्रतिबंधनाचा नामजप चालू होता. राजंदेकर कुठलीही अडचण न सांगता नियमितपणे सलग ३ वर्षे नामजप लावत असत.

२ आ. सेवाभाव : त्यांनी कधीही वयाचे कारण सांगून सेवेला नकार दिला नाही.

२ इ. साधकांचा आधार असणे : साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना ते ‘साधकांना आधार वाटेल’, असे दृष्टीकोन देत असत. ते अधूनमधून साधकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी सोडवत असत. त्यांची सर्व साधकांवर समान प्रीती होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटत होता.’

३. सौ. मंदा भालतिलक, अकोला

अ. ‘मी माझ्या सगळ्या अडचणी राजंदेकरांना सांगू शकत असे. त्यामुळे ते माझ्या घरी आल्यावर मला पुष्कळ आनंद होत असे.

आ. माझे त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले, तरी माझ्या नामजपात वाढ होत असे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २१.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक