भारतीय दूतावासाकडून कंबोडियातील ३६० ओलिसांची सुटका

चिनी हस्तकांनी ठेवले होते ओलीस !

कंबोडिया मधून परतलेले भारतीय

नोम पेन्ह (कंबोडिया) – भारतीय दूतावासाने कंबोडियामध्ये चिनी हस्तकांनी ओलीस ठेवलेल्या ३६० भारतियांची सुटका केली आहे. पीडितांना आधी नोकरीचे आमीष दाखवून नंतर ओलीस ठेवण्यात आले होते. आता सर्वांना लवकरच भारतात आणण्याची सिद्धता चालू आहे. त्यांपैकी ६० भारतीय नागरिकांची पहिली तुकडी मायदेशी परतली आहे.

कंबोडियातील भारतीय दूतावासाला काही फसव्या नोकरी पुरवठादारांनी (चिनी दलालांनी) भारतियांना पकडून ठेवल्याची बातमी मिळाली होती. या भारतियांची २० मे या दिवशी जिनबेई-४ नावाच्या ठिकाणाहून अधिकार्‍यांनी सुटका केली. ही कारवाई सिहानोकविले येथील अधिकार्‍यांच्या समन्वयाने पार पडली.

यापूर्वीच भारतीय दूतावासाने कंबोडियाला नोकरीसाठी जाणार्‍या लोकांसाठी एक मार्गदर्शिका प्रसारित केली आहे.