रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धाचा भारतासाठी धडा !

इस्रायल-हमास यांच्या युद्धातील एका इमारतीच्या विध्वंसाचे प्रातिनिधिक छायाचित्र

आपल्याकडे सैन्यभरती म्हटली, म्हणजे सहस्रो युवक येतात; पण फारच थोड्या युवकांची सैन्यात भरती होते. या पुढे चीन किंवा पाकिस्तान यांच्या विरुद्ध चालणार्‍या प्रदीर्घ महायुद्धाकरता मोठ्या संख्येने सैनिकांची आवश्यकता भासेल, त्या वेळी सैन्यात भरती होण्याकरता नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत करावे लागेल. तसे झाले, तरच ते सैन्यात भरती होतील. सध्या रशिया, युक्रेन, युरोप आणि इतर देशांत युद्धासाठी सैनिकांची कमतरता भासत आहे; मात्र तशी स्थिती भारतात निर्माण होणार नाही.

१. सध्या चालू असलेली युद्धे म्हणजे शस्त्रास्त्रांची प्रयोगशाळा

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

आज जगात ६० ठिकाणी युद्ध चालू आहेत. त्यातील २ महत्त्वाच्या युद्धभूमी आहेत युक्रेन-रशिया आणि इस्रायल-हमास ! या युद्धभूमीवर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि तंत्रज्ञान वापरले जात आहे. या युद्धभूमी प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठले तंत्रज्ञान अधिक प्रभावी आहे आणि कुठले नाही ? हे स्पष्ट होत आहे. विमाने विरुद्ध क्षेपणास्त्रविरोधी लढाऊ विमाने (अँटी मिसाईल एअरक्राफ्ट) यांमध्ये क्षेपणास्त्रांचा विजय झाला आहे. रणगाडे विरुद्ध क्षेपणास्त्रविरोधी रणगाडे (अँटी मिसाईल टँक) यांमध्ये क्षेपणास्त्र जिंकली आहेत. रणगाड्यांची हानी ही दोन्ही देशांच्या रणगाड्याच्या लढाईत झाली नाही. त्यांची छोट्या, कमी किमतीच्या, लपून आणि लांबून डागलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनी हानी केली. रशियाच्या काळ्या समुद्रातील मोठ्या विमानवाहू नौका, इतर युद्धनौका लांबून डागलेल्या क्षेपणास्त्रांनी डुबवल्या आणि त्यानंतर रशियन नौदल लढण्याकरता पुढे आलेच नाही. क्षेपणास्त्रांमुळे होणारी हानी असह्य झाल्यामुळे रशियन हवाई दलाने या लढाईमध्ये फारसा भाग घेतला नाही. हवाई दलापेक्षा ड्रोन्स कितीतरी अधिक पटींनी प्रभावी ठरले आहेत.

२. रशिया-युक्रेन येथील युवकांची सैन्यात भरती होण्याविषयीची उदासीनता

महागडी लढाऊ जहाजे, विमाने, रणगाडे हे पांढरे हत्ती बनले आहेत. शत्रूची लढाऊ जहाजे, विमाने, रणगाडे, मोठी शस्त्रे की, जी आकाशातून ओळखता येतात, त्यांच्यावर लांबून क्षेपणास्त्र डागून त्यांची हानी करता येते; मात्र या युद्धामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, शस्त्र आणि शस्त्र चालवणारा सैनिक यांमध्ये सैनिक हा अधिक महत्त्वाचा आहे. रशियामध्ये लढण्याकरता लढाऊ युवकांची कमतरता जाणवत आहे; कारण श्रीमंत रशियन पहिलेच रशिया सोडून युरोप आणि इतरत्र पळून गेलेले आहेत. अनेक रशियन युवक सैन्यात भरती व्हायचे नाही; म्हणून देशामध्ये कुठेतरी लपून बसलेले आहेत. ‘युद्ध थांबवा’, म्हणून रशियामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत.

सैनिकांविषयीची युक्रेनची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. त्यांनाही लढणार्‍या सैनिकांची कमतरता पडत आहे; कारण सहस्रो मारले गेले किंवा घायाळ झाले. युक्रेनचे अनेक नागरिक विविध कारणे काढून निर्वासितांसह युक्रेनच्या बाहेर पळून गेले आहेत. युक्रेनचे अनेक युवक युद्धभूमीवर जायला सिद्ध नाहीत. असा प्रचार करण्यात आला होता की, युक्रेनचे नागरिक हे देशावर अधिक प्रेम करतात आणि देशासाठी लढण्यासही ते सिद्ध आहेत; मात्र हे काही प्रमाणातच सत्य आहे. अनेक नागरिक स्वतःचा प्राण वाचवण्यामध्येच गुंतलेले आहेत. युक्रेनच्या सैनिकांचे सरासरी वय आहे ४५ वर्षे. याचाच अर्थ तरुणांच्या ऐवजी मध्यमवयीन सैनिक युद्धभूमीवर अधिक आहेत. ४५ वर्षांच्या मध्यमवयीन सैनिकाची जर २५ वर्षीय तरुण सैनिकांशी चकमक झाली, तर काय होईल ? अर्थातच तरुण सैनिक जिंकेल. युरोपमधील अनेक लहान देशांत सैन्यात जाण्याकरता तरुण मंडळीच उरलेली नाहीत.

३. चीनची सैनिक भरतीविषयीची दयनीय स्थिती

चीनचीसुद्धा अवस्था अशीच दयनीय आहे. चिनी नागरिकसुद्धा सैन्यामध्ये जायला सिद्ध नाहीत. श्रीमंत देश झाल्यामुळे बहुतेक चिनी नागरिक हे श्रीमंत मध्यमवर्गीय झालेले आहेत आणि यामुळे शहरात रहाणारे युवक नाजूक बनले आहेत, जे तिबेटसारख्या युद्धभूमीवर जायला सिद्ध नाहीत. सध्या चीनसमवेतचा संघर्ष हा लडाख, अरुणाचल, सिक्कीम येथे होत आहे. या युद्धभूमीवर आधुनिक शस्त्रांचा फारसा उपयोग नाही. चीनच्या सैनिकांमध्ये शक्ती, सहनशीलता, क्षमता, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती आणि कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता यांची आवश्यकता आहे. याउलट हे गुण भारतीय सैन्यात आढळतात.

चिनी सैनिक एक वर्षाचे प्रशिक्षण घेतात, त्यात ३ मासांचे प्रशिक्षण हे साम्यवादी पक्षाचे कार्यकर्ते कसे व्हावे, हे असते. चिनी सैनिक प्रशिक्षण घेऊन फक्त २ वर्षे सैन्यात असतात. त्यामुळे सैन्यातून बाहेर पडल्याने रोजीरोटीसाठी काय कमवायचे ? याची त्यांना काळजी असते. परिणामी युद्धात लढण्यात त्या सैनिकांना रस नाही.

४. भारतीय सैनिक आणि अधिकारी यांची श्रेष्ठता

सैनिक आणि अधिकारी यांच्यात दुरावा आहे. भारतीय सैन्याधिकारी आणि सैनिक यांच्यातील संबंध अत्यंत उत्तम आहेत. ते एखाद्या बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये एकत्र असतात. ते आपल्या बटालियन किंवा रेजिमेंटला स्वतःचे दुसरे घरच समजतात. पूर्ण आयुष्यभर त्यांची रेजिमेंट, बटालियन हीच त्यांची ओळख असते. ही मैत्री शेवटपर्यंत चालू असते. ‘गलवान’मध्ये भारताचे कमांडिंग अधिकारी कर्नल बाबू यांच्यावर चिनी सैनिकांनी आक्रमण केले, तेव्हा कुठल्याही परिणामांचा विचार न करता संख्येने अल्प असलेल्या भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांवर आक्रमण करून त्यांना कसे रक्तबंबाळ केले, हे आपण पाहिले आहे.

भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्‍यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात. त्यामुळेच प्रत्येक वर्षी अनेक सैन्याधिकारी देशासाठी प्राणाचे बलीदान देतात. त्यांच्या पराक्रमामुळे देशाला विजय मिळतो. सैनिकांना लढण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन आणि आक्रमकता ही अधिकार्‍यांमुळे येते. याचा चिनी सैन्यामध्ये अभाव आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (११.५.२०२४)