काळाचा पडदा ओलांडून सूक्ष्म दृष्टीने जीवनाडीपट्टीचे वाचन करणार्‍या ऋषितुल्य योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा द्रष्टेपणा !

२५.५.२०२४ (वैशाख कृष्ण द्वितीया) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची ५वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सेवा करत असतांना मला त्यांचे द्रष्टेपण प्रकर्षाने जाणवले. त्यांनी प.पू. डॉक्टरांची ‘परम पूज्य’ ही उपाधी आणि त्यांचा पुनर्जन्म यांवर केलेले भाष्य ऐकल्यावर प.पू. डॉक्टरांच्या जीवनाडीपट्टीच्या वाचनातून सप्तर्षींनीही नंतर तसेच सांगितले असल्याचे माझ्या लक्षात आले.

उजवीकडे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याशी संवाद साधतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (वर्ष २०११)

१. प.पू. डॉक्टरांची महती दर्शवणारी उपाधी लावणे

श्री. अतुल पवार

१ अ. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी प.पू. डॉक्टरांची ‘परम पूज्य’ ही उपाधी पालटण्याविषयी सूचित करणे : वर्ष २०१६ मध्ये योगतज्ञ दादाजी वैशंपायन मला म्हणाले होते, ‘‘प.पू. डॉक्टरांच्या नावाआधी ‘परम पूज्य’ असे लिहितात, ते आता पालटायला हवे; कारण आता कलियुगात ‘प.पू.’ ही पदवी सर्वसामान्य झाली आहे. आता कुणीही आपल्या नावाआधी ‘प.पू.’ लावत आहे. प.पू. डॉक्टरांना शोभणारी उपाधी असायला हवी.’’ योगतज्ञ दादाजी प.पू. डॉक्टरांच्या नावाआधी ‘तीर्थरूप’ असे लिहू लागले. तेव्हा त्यांनी मला ‘तीर्थरूप’ आणि ‘तीर्थस्वरूप’ या शब्दांचे अर्थ सांगितले. ते म्हणाले, ‘‘तीर्थरूप’ म्हणजे प्रत्यक्ष तीर्थ’ आणि ‘तीर्थस्वरूप’ म्हणजे तीर्थासारखे; पण प्रत्यक्ष ‘तीर्थ’ नाही. प.पू. डॉक्टर हे प्रत्यक्ष ‘तीर्थ’ आहेत.’’

१ आ. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी मे २०१६ मध्ये प.पू. डॉक्टरांना लिहिलेल्या पत्रात त्यांना ‘तीर्थरूप’ असे संबोधणे : वरील विषयाला अनुसरून योगतज्ञ दादाजींनी प.पू. डॉक्टरांना लिहिलेल्या पत्रात (पत्राच्या मायन्यात) पुढीलप्रमाणे पालट केले.

‘दादाजी उवाच.
तीर्थरूप रा.रा. डॉक्टर यांस,
साष्टांग नमस्कार.

आता माझ्या दृष्टीने तरी तुमच्या ‘प.पू.’ या शब्दाचे (उपाधीचे) उच्चाटन होऊन त्याची जागा ‘तीर्थरूप’ या शब्दाने घेतली आहे; म्हणून ‘आता अमृत महोत्सवाच्या दिवशी ग्वाही व्हावी’, ही आग्रहाची विनंती. ‘आपण हाती घेतलेले अवर्णनीय कार्य आपल्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाने सफल होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’

– शुभम्
दादाजी.

तेव्हापासून योगतज्ञ दादाजी प.पू. डॉक्टरांना पत्र लिहितांना पत्राच्या आरंभी प.पू. डॉक्टरांचा उल्लेख ‘तीर्थरूप रा.रा.’(राजमान्य राजश्री) असा करत असत.

१ इ. ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’ वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’, ही नवी उपाधी प्रदान करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी (वैशाख कृष्ण सप्तमीला), १३.५.२०२० या दिवशी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या वाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी प्रदान केली. ‘प.पू.’ या शब्दाची जागा ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या शब्दाने घेतली. त्यानंतर १३.७.२०२२ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तर्षींनी नाडीपट्टीद्वारे ही उपाधी समाजात सर्वत्र रूढ होण्याच्या दृष्टीने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावावी’, अशी आज्ञा केली. या आज्ञेनुसार १३.७.२०२२ पासून परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे संबोधण्यास आरंभ झाला आहे.

२. पुनर्जन्माविषयी केलेले भाष्य

२ अ. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी प.पू. डॉक्टरांच्या पुनर्जन्माविषयी केलेले भाकीत : वर्ष २०१४ मध्ये मी योगतज्ञ दादाजींच्या सेवेसाठी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा मी नवीन असल्यामुळे मला योगतज्ञ दादाजी यांच्याविषयी किंवा त्यांच्या दैवी सामर्थ्याविषयी विशेष काही ठाऊक नव्हते. योगतज्ञ दादाजी दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करत असत. तेव्हा त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणे’ हे वाक्य वाचले होते. त्यांनी मला विचारले, ‘‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणे, म्हणजे काय ?’’ मी माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे त्यांना म्हणालो, ‘‘पुन्हा जन्म नाही.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टर त्यांचे पुढील कार्य करण्यासाठी पुन्हा जन्म घेणार आहेत. तेव्हा त्यांच्या समवेत तुमचाही (साधकांचाही) जन्म होईल.’’ हे ऐकून मला जरा आश्चर्य वाटले; कारण मी कधी याचा विचारच केला नव्हता.

२ आ. कालांतराने जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षींनीही प.पू. डॉक्टरांच्या पुनर्जन्माविषयी उल्लेख केल्यावर योगतज्ञ दादाजी यांच्या दैवी शक्तीची प्रचीती येणे : त्यानंतर वर्ष २०१७ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये महर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांच्या पुनर्जन्माविषयीचे लिखाण प्रसिद्ध झाले होते. तेव्हा मला योगतज्ञ दादाजी यांनी यापूर्वी प.पू. डॉक्टरांच्या पुनर्जन्माविषयी सांगितलेल्या प्रसंगाची आठवण झाली आणि योगतज्ञ दादाजी यांच्या दैवी शक्तीची प्रचीती आली.

त्यानंतर माझे पुढील चिंतन झाले. ‘प.पू. डॉक्टर अवतार असल्यामुळे त्यांना ‘जन्म-मृत्यू’ असे काहीच नाही. धर्मकार्याच्या आवश्यकतेनुसार त्यांचे अवतारी कार्य युगानुयुगे असेच चालू असणार.’

३. सूक्ष्मदृष्टीने भृगुनाडीपट्टी पाहून भाकीत वर्तवणारे ऋषितुल्य योगतज्ञ प.पू. दादाजी !

योगतज्ञ दादाजी यांनी लिहिलेल्या काही भाकितांच्या पुढे ते ‘भृगुसंहिते’चा संदर्भ देत असत. त्यामुळे त्यांनी ज्या व्यक्तीविषयी भाकीत लिहिले असेल, तिला भाकिताविषयी अधिक विश्वास निर्माण होत असे. ‘योगतज्ञ दादाजी सूक्ष्मदृष्टीने भृगुनाडीपट्टी पाहून भाकीत वर्तवणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे होते’, असे त्यांच्या सहवासातून मला जाणवले.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक