डोंबिवली (जिल्हा ठाणे) – येथील एम्.आय.डी.सी. भागातील सोनारपाडा या ठिकाणी अंबर या रासायनिक आस्थापनात २३ मेच्या दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला. यानंतर छोट्या छोट्या स्फोटांचेही काही आवाज ऐकू आले. या स्फोटात ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४८ जण घायाळ झाले आहेत. या स्फोटांमुळे साधारण ३ ते ४ कि.मी.चा परिसर हादरला. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेनंतर ‘डोंबिवली येथील रासायनिक आस्थापने अंबरनाथला हलवणार आहोत’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या स्फोटांची तीव्रता इतकी होती की, आजूबाजूच्या इमारतींच्या, तसेच रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटांमुळे रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर राख, तसेच मोठमोठे लोखंडी कणही उडाले.
राख वाहनांवर पडल्यामुळे वाहनचालक भयभीत झाले. काही पादचारीही राखेने माखले. या स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून आले. सर्व जण जिवाच्या आकांताने पळत असल्याचे दिसून येत होते.
काही पालक रस्त्यावरून त्यांच्या लहान मुलांसह चालत जात होते; पण अचानक स्फोट झाल्याने मुले घाबरून मोठ्याने रडू लागली.
बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर अंतरापर्यंत उडाले, तसेच सगळ्या इमारतींच्या काचा फुटल्या ! – स्थानिक प्रत्यदर्शी
आजूबाजूच्या परिसरातील एकाही सोसायटीच्या काचा शेष राहिलेल्या नाहीत. अनेक लोक घायाळ झाले आहेत. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर अंतरार्पंत उडाले. हे तुकडे चारचाकी गाड्यांवर पडल्याने गाड्याही दबल्या गेल्या.
२० ते २५ घायाळ लोकांना धावतांना पाहिले ! – माजी नगरसेवक मंदार हळबे
आम्ही साधारण २० ते २५ घायाळ लोकांना धावतांना पाहिले. स्फोट होऊन काही वेळ झाल्यानंतरही आस्थापनात ठेवलेल्या रासायनिक ड्रमचे स्फोट होत होते. धुराचे प्रचंड लोट बाहेर येत असल्याने अग्नीशमन दलाला आत जाणे शक्य नव्हते.
डोंबिवलीतील स्फोटाची घटना दु:खद ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीतील स्फोटाची घटना दु:खद आहे. यात ८ जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. घायाळांच्या उपचारांची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सिद्ध ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली आहे. घायाळांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
एम्.आय.डी.सी.ने ‘फायर ऑडिट’ (अग्नी सुरक्षा परीक्षण) केले होते का ? – आमदार जितेंद्र आव्हाड
एम्.आय.डी.सी.ने ‘फायर ऑडिट’ केले होते का ? कारण महाराष्ट्र सरकारचा हा विभाग फायर ऑडिट करत नाही. काही वर्षांपूर्वीही येथे स्फोट झाला होता. त्यावर काय उपाययोजना केली ? एम्.आय.डी.सी.ने किती आस्थापनांचे ‘फायर ऑडिट’ केले आहे ?, त्याची श्वेतपत्रिका काढावी.
अतीधोकादायक रसायनांची निर्मिती करणारी आस्थापने शहराबाहेर हलवण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ! – खासदार श्रीकांत शिंदे
आम्ही जिल्हाधिकार्यांशी बोललो आहोत. अतीधोकादायक रसायनांची निर्मिती करणारी आस्थापने शहराच्या बाहेर नेली जावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. येत्या ६ महिन्यांत येथील अतीधोकादायक रसायने सिद्ध करणारी आस्थापने शहराबाहेर नेण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू.
घायाळांच्या उपचारांचा खर्च सरकार करणार ! – उद्योगमंत्री
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन साहाय्यता कार्याचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘घायाळ झालेल्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे, तसेच या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.