टीकाकारांना थांबवा !

उत्तरप्रदेशमध्ये इयत्ता दहावीत सीतापूरच्या प्राची निगम हिने राज्यात पहिला क्रमांक पटकावत ९८.५ टक्के गुण मिळवले. प्राचीचे अभिनंदन करणारे छायाचित्र प्रसारित होऊ लागताच तिने आणि तिच्या कुटुंबाने स्वप्नातही विचार केला नसेल, अशा भयंकर ‘ट्रोलिंग’(समाजमाध्यमावरील टीके) चा सामना त्यांना करावा लागला. एका आजारामुळे प्राचीच्या ओठांवर केस आहेत. त्यामुळे टीकाकारांनी तिला ‘तू मुलगी आहेस का ?’, असा प्रश्न विचारायलासुद्धा मागे-पुढे पाहिले नाही. ‘कदाचित एक-दोन गुण अल्प पडले असते, तरी बरे झाले असते’, असे वाटावे इतका मनस्ताप प्राचीला सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एका इमारतीच्या गॅलरीवर लावलेल्या शेडवर एक लहान मूल वरच्या गॅलरीतून खाली पडले असता स्थानिकांनी मोठ्या धैर्याने या मुलाला छतावरून सुखरूप खाली उतरवले असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या लहान मुलाला वाचवणार्‍या स्थानिकांचे कौतुक होत असतांना दुसरीकडे मात्र समाजमाध्यमांमध्ये मुलाच्या आईवर टीका होऊ लागली. आईने मुलाकडे लक्ष दिले नाही, म्हणून ते मूल गॅलरीतून खालच्या छतावर पडले. आईनेच हलगर्जीपणा केला असेल, असेही बोलले जाऊ लागले. या टीकेमुळे आईला प्रचंड मानसिक ताण आला. समाजमाध्यमावर होणार्‍या टीकेमुळेच या महिलेने अलीकडेच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. आता इंटरनेटच्या पालटत्या स्वरूपामुळे सायबर गुन्ह्यांव्यतिरिक्त इंटरनेटवर टीकेच्या माध्यमातून खिल्ली उडवणे, आक्षेपार्ह आणि अनावश्यक टीकाटिप्पणी करणे, प्रसंगी शिवीगाळ करणे, चारित्र्यहनन करणे असे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, ब्लॉग, फेसबुक, एक्स आदींवर एखाद्या विषयावरील सामान्य चर्चेला अथवा विषयाला विपर्यास करून चिथावणी देणे हाच या टीकेमागचा उद्देश असतो. इंटरनेटच्या जगात वर्तमान विषयांवर चालू असलेल्या चर्चेत हे टीकाकार उडी घेतात आणि आक्षेपार्ह टीका करतात. याशिवाय हे लोक विनाकारण इतरांचा अपमान आणि शिवीगाळ करून अनेकांना प्रकरणांमध्ये ओढतात. ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. खरेतर प्राची निगम हिचे तिने केलेल्या उत्तुंग कामगिरीसाठी कौतुकच होणे योग्य होते. तिच्या बाह्यरूपापेक्षा तिचे कर्तृत्व पहाणे योग्य होते. बाळाच्या आईला ‘आपल्या मुलाचे वाईट व्हावे’, असे कधीच वाटणार नाही; पण सततच्या टीकेमुळे ती स्वत:ला अपराधी समजू लागली. तिला त्या वेळी मानसिक आधाराची आवश्यकता होती. ती वैफल्यग्रस्त झाल्यानंतरचा परिणाम समोर आला. टीकाकारांना सामाजिक दायित्वाचे भान नसल्याने केवळ वेळ घालवणे, मनोरंजन यांसाठी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देणार्‍यांना, टीका करणार्‍यांना थांबवायलाच हवे !

– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी आश्रम, गोवा.