वाहनांना डोळ्यांसाठी घातक प्रकाशाचे दिवे लावणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी ! – सुराज्य अभियान

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वाहनांच्या पुढच्या दिव्यांमध्ये (हेडलाईटमध्ये) डोळ्यांना घातक असे ‘बल्ब’ (दिवे) असलेल्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा घातक दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे डोळे दिपतात. यामुळे अपघाताच्या दुर्घटनाही घडल्या असून यामुळे काहींचा मृत्यूही ओढवला आहे. त्यामुळे वाहनांना घातक प्रकाशाचे दिवे लावून नागरिकांच्या आयुष्याशी खेळणार्‍यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर करवाई करावी, मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाने राज्य सरकारकडे केली आहे. सुराज्य अभियानाकडून याविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे याविषयीची अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘वाहनांच्या दिव्यांमध्ये अशा प्रकारे घातक पालट करणे, हा गुन्हा आहे. वाहन चालकाच्या डोळ्यांवर किंवा रस्त्याने चालणार्‍यांच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडल्यास काही क्षण डोळ्यांपुढे अंधारी येते. समोरून येणार्‍या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटू शकते किंवा तो विचलीत होऊ शकतो. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. गुजरात येथील परिवहन विभागाने चारचाकी गाडीवर ‘एल्.ई.डी. व्हाईट लाईट’ बसवणार्‍यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. असे दिवे असलेल्या वाहनांच्या मालकंवरही कारवाई केली जात आहे. अहमदाबाद येथील प्रादेशिक परिवहन विभागाने ‘एल्.ई.डी. व्हाईट लाईट’ असलेल्या वाहनांवर करवाईची मोहिमची चालू केली आहे. शिरस्त्राण, ‘सीट बेल्ट’ नसेल किंवा वाहनाला काळी काच बसवली असेल किंवा मद्य पिऊन वाहन चालवल्यास ज्याप्रमाणे कारवाई केली जाते, त्याप्रमाणे डोळ्यांना घातक असलेल्या प्रकाशाचे दिवे वाहनांना लावणार्‍यांवरही पोलिसांनी तितक्याच तत्परतेने कारवाई करावी.’’

चालक, मालक आणि विक्रेते यांच्यावरही कारवाई व्हावी !

‘एल्.ई.डी. व्हाईट लाईट’ लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई तर करावीच; परंतु जोपर्यंत अशा प्रकारचे दिवे पालटले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित वाहने पोलिसांनी कह्यात घ्यावीत. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी धडक मोहीम राबवावी. नाकाबंदीच्या ठिकाणी घातक प्रकाश असलेल्या वाहनांवरही कारवाईचा आदेश द्यावा. याविषयी प्रादेशिक परिवहन विभागाकडून जनजागृती मोहीमही राबवावी. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या दिव्यांची विक्री करणारे दुकानदार, किरकोळ आणि घाऊक विक्रेते यांवरही कारवाई करण्यात यावी, अशा मागण्याही सुराज्य अभियानाकडून करण्यात आल्याची माहिती श्री. अभिषेक मुरुकटे यांनी दिली.