दायित्वशून्य महापालिका प्रशासन !
कोल्हापूर – महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे नुकतीच पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर आलेले असतांना रंकाळा तलावही मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावात १९ मे या दिवशी मासे मृत झाल्याचे आढळून आले. गळाच्या माध्यमातून मासेमारी करणार्या काही लोकांकडून तलावात मासे पकडण्यासाठी पोळी, ब्रेड सर्रास टाकले जातात, तसेच प्लास्टिकच्या बाटल्यांचा खचही पडलेला दिसतो. शेजारी खाणीतून दूषित पाणी थेट रंकाळा तलावात येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अनेकांनी वापरत नसलेल्या साड्या तलावाच्या विविध बाजूंना टाकून दिल्या आहेत. पंचगंगेच्या काठाप्रमाणे खराब झालेली विविध देवतांची चित्रे तलावाच्या शेजारी टाकून देण्यात आली होती. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने देवतांच्या चित्रांचे विसर्जन कसे करावे ? हे त्यांच्या लक्षात येत नाही, तसेच धर्माभिमानाअभावी अशा प्रकारे तलाव, नदीच्या काठावर वस्तू टाकून दिलेल्या आढळतात ! – संपादक) या संदर्भात ‘समाजमन संस्थे’चे अध्यक्ष श्री. महेश गावडे म्हणाले, ‘‘अनेक जण तलावात स्नान करतात, खराब-मळके कपडे धुतात. इतकेच नाही, तर कधी-कधी प्राणीही यात धुतले जातात. महापालिकेने हे सर्व करण्यास बंदी घातली असली, तर त्याची काटेकोर कार्यवाही होणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी सुरक्षापथक नेमणे, पर्यावरणप्रेमी स्वयंसेवक नेमणे आवश्यक आहे. प्रसंगी नियम आणि कायदा मोडणार्यांवर कडक शिक्षेचे प्रावधान असायला हवे. सध्या रंकाळ्याच्या पाण्यावर काळपट रंगाचा तेलकट तवंग निर्माण होत आहे आणि ही रंकाळ्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.’’