सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेला रथोत्सवसोहळा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे’, हे समजल्यापासून श्री. शंकर नरुटे (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथोत्सवापूर्वीच झालेली भावजागृती

अ. साधक करत असलेल्या रथोत्सवाच्या सिद्धतेच्या वेळी आश्रमातील आनंदी वातावरण पाहून माझा भाव जागृत झाला.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आतापर्यंत मला साधनेत टिकून रहाण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी सातत्याने केलेले साहाय्य आठवून माझी भावजागृती झाली.

श्री. शंकर नरुटे

इ. पूर्वी माझी भावजागृती सहजतेने होत नसे; पण या जन्मोत्सवाच्या २ दिवस आधीपासूनच माझा भाव आपोआप जागृत होत होता. प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र पाहिले, तरी माझी भावजागृती होत होती.

२. रथोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

२ अ. ‘भगवंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने पृथ्वीवर आला आहे’, असे वाटणे : भगवंत साधकांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने नेहमीच कार्य करत असतो; पण आज तो ‘स्थूल रूपाने सर्व साधकांना आशीर्वाद आणि दर्शन देण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात रथावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतरला आहे’, असे मला वाटत होते. परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णु रूपात सर्वांच्या समोर आल्यामुळे साधक देहभान विसरून भगवंताला पहात त्याची चैतन्यशक्ती अनुभवत होते.

२ आ. साधकांच्या मुक्तीची वेळ आल्यामुळे भगवंताची कृपादृष्टी साधकांवर पडणे : सर्व साधकांच्या मुक्तीची वेळ आल्यामुळे भगवंत सर्व साधकांच्या जवळ जाऊन त्यांच्यावर कृपादृष्टी टाकत होता. त्याची कृपादृष्टी सर्व साधकांवर पडली, तेव्हा ‘सर्व साधक ‘वाईट शक्तींचे आवरण आणि माया’ यांतून मुक्त होत आहेत’, असे मला साधकांच्या चेहर्‍याकडे पाहून वाटत होते. ‘भगवंताची कृपादृष्टी सर्व साधकांवर सदोदित असतेच’, असा माझा भाव त्या काळात टिकून राहिला होता.

२ इ. ‘रथाचे मार्गक्रमण आकाश आणि सप्तलोक यांतून होत आहे’, असे जाणवणे : रथोत्सवाचा प्रवास ‘रामनाथी आश्रम ते नागेशी’, असा स्थुलातून चालू होता; पण तो रथोत्सव ‘सूक्ष्मरूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर भ्रमण करत असून सप्तलोकांमध्ये ही त्या रथाचे भ्रमण चालू आहे’, असे मला जाणवत होते.

२ ई. रथोत्सवात चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे वाईट शक्ती त्रास देऊ न शकणे : रथोत्सवात वाईट शक्ती अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होत्या; पण त्या दिवशी भगवंताची शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे वाईट शक्तींची शक्ती अल्प पडत होती. त्या दिवशी सत् आणि असत् (चैतन्य शक्ती आणि वाईट शक्ती) यांच्यात सूक्ष्म युद्ध चालू होते. त्यातून ‘या लढ्यामध्ये विजय आपलाच आहे’, हे भगवंत आम्हाला पुनःपुन्हा दाखवत होता.

२ उ. साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणारी शक्ती ग्रहण करता आल्यामुळे साधकांना अंतर्मनात रामराज्य स्थापन झाल्याची अनुभूती येणे : पूर्वी गुरुमाऊलींमधील काही टक्केच चैतन्यशक्ती कार्यरत होती; पण साधकांमधील भाव आणि काळाचा महिमा यांमुळे ‘त्या दिवशी गुरुमाऊलींची ८० टक्के चैतन्यशक्ती कार्यरत झाली होती’, असे मला जाणवत होते आणि ते चैतन्य साधकांना ग्रहण करता येत होते. या चैतन्यशक्तीचा परिणाम पृथ्वी अन् सप्तलोक येथेही चांगल्या प्रमाणात होऊन देवता, ऋषिमुनी आणि सर्व साधक कार्यरत झाले होते. सर्व साधक ‘ईश्वरी राज्य’ किंवा ‘रामराज्य’ अंतरात स्थापन झाल्याची अनुभूती घेत होते.

२ ऊ. भगवंताचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपातील अवतारकार्य सर्वांना समजावे आणि ‘सर्वांना त्या चैतन्यशक्तीचा लाभ व्हावा’, या उद्देशाने हा जन्मोत्सव सोहळा रथोत्सवाच्या माध्यमातून कार्यरत होता.

३. कृतज्ञता

मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या विषयी कृतज्ञता वाटत होती. ‘आपण त्यांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करायला हवेत’, असे मला आतून सतत वाटत होते. गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले; म्हणून मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक