छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि आधुनिक वैद्य यांच्यात हाणामारी !

घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर – कानात किडा गेल्यामुळे घाटी रुग्णालयात आलेल्या  रुग्णावर उपचारासाठी विलंब झाला. आधुनिक वैद्यांनी तरुणीवर उपचार न करता तिला सुनावल्याने रुग्णाचे नातेवाईक आणि आधुनिक वैद्य यांच्यात १६ मेच्या मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत हाणामारी झाली. नातेवाइकांनी  अधिष्ठात्यांकडे तक्रार करून २ आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी घाटी प्रशासनाने ३ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

‘‘कानात किडा गेल्याने वेदना होत आहेत. मला येऊन ४५ मिनिटे झाली आहेत,’’ असे तरुणी म्हणाली. त्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘कानात हत्ती किंवा डायनासोर तर गेला नाही ना ? १० मिनिटे थांब.’’ रुग्णाच्या नातेवाइकांनी नाक, कान आणि घसा तज्ञ डॉ. कल्याणी उगले आणि आधुनिक वैद्य मयूर पाटील यांच्या विरोधात उपचारास नकार दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्याकडेही कारवाईची मागणी केली आहे. ‘चौकशीनंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल’, असे डॉ. सुक्रे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका :

संवेदनाशून्य आधुनिक वैद्यांमुळे रुग्णांना कधीतरी उपचार योग्य होतील, याची निश्चिती वाटेल का ?