नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे; मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘पोलिसांना हाताशी धरून ठाकरे गटावर दबाव टाकला जात आहे’, असा आरोप होत आहे. यापूर्वी नोंद असणार्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावल्याचा उल्लेख या नोटिसीमध्ये करण्यात आला आहे.
‘नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मागील काळात गुन्हे नोंद असणार्या व्यक्तींना मतदानाच्या दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये थांबायचे नाही’, अशा नोटिसा देण्यात आल्या आहेत; मात्र हे सर्व जाणीवपूर्वक केले जात आहे. पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होत असल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या वतीने अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात येत आहेत. आमच्या महत्त्वाच्या पदाधिकार्यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठीच अशा प्रकारे पोलिसांचा वापर करून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत’, असा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे.