आरोपींना २० मेपर्यंत पोलीस कोठडी !
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथे तंत्रनिकेतनची (पॉलिटेक्निक) विद्यार्थिनी आणि तिची आई गर्भलिंगनिदान करत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे जिल्ह्यातील सिल्लोड गावापर्यंत पोचले आहेत. येथील ‘श्री रुग्णालया’मध्ये हे गर्भपात करायचे, अशी माहिती अन्वेषणात उघड झाली आहे. त्यामुळे येथील पोलिसांनी १६ मे या दिवशी तिथे धाड घालून चौकशी केली. रात्री विलंबापर्यंत आधुनिक वैद्य रोशन ढाकरे याच्यासह त्याच्या ३ कर्मचार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या चौघांचाही गर्भलिंग चाचणीसमवेतच अवैध गर्भपात ‘रॅकेट’मध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आले. आरोपी आधुनिक वैद्य रोशन ढाकरे, परिचारक (कंपाउंडर) संदीप काळे, गोपाळ कळात्रे आणि नारायण यांना १७ मे या दिवशी संभाजीनगर येथील न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१६ मे या दिवशी दुपारपासून छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांचे पथक सिल्लोड येथील जयभवानीनगर भागातील श्री रुग्णालयात आले होते. या ठिकाणी रात्री ९ वाजेपर्यंत पोलिसांनी रुग्णालयाची झडती घेत महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेतली. त्यानंतर वरील चौघांची चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकांची विल्हेवाट कुठे लावली जात होती ? याची माहिती पोलिसांना रात्री ११ वाजता मिळाली. चौघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी हे कृत्य केल्याचे मान्य केले.
नाल्यात सापडले अर्भक !
सिल्लोड-भराडी रस्त्यावरील मोढावाडी फाटा येथून डाव्या बाजूला एक ते दीड कि.मी. अंतर आत गेल्यावर पाबळवाडी क्षेत्रातील नाले आणि चार्या खोदलेल्या ठिकाणी अर्भकांची विल्हेवाट लावली जात होती. पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली असता एक मृत अर्भक, पिशव्या आणि इतर साहित्य आढळून आले. अनेकदा पहाटे ३ वाजता गर्भपात केला जात होता. गर्भपात केल्यावर संबंधित महिला रुग्णाला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुटी देऊन घरी पाठवले जात होते.
राज्यातील अनेक शहरांतील महिलांनी अवैध गर्भपात केले !
सिल्लोड येथील अवैध गर्भपात केंद्राची पाळेमुळे राज्यभरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा चालू होता. श्री रुग्णालयात तालुक्यातील ग्रामीण भागासह शेजारी भोकरदन आणि कन्नड तालुक्यांतून महिला येत होत्या. याशिवाय जळगाव, रावेर, भुसावळ, नांदेड, पुणे, मुंबई येथूनही मोठ्या प्रमाणात महिला रुग्ण सिल्लोड येथे लिंगनिदान चाचणी आणि अवैध गर्भपात करण्यासाठी येऊन गेल्या आहेत.
सोनोग्राफी यंत्र आढळले !
पोलिसांनी रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर आधुनिक वैद्य रोशन हा त्याचा परिचारक (कंपाउंडर) गोपाल कळांत्रे याचा वाढदिवस असल्याने मद्याची मेजवानी करत होता. पोलिसांना त्यांनी उडवाउडवाची उत्तरे दिली. पोलिसांनी झडती घेतली असता तेथे सोनोग्राफी यंत्र आढळून आले. आरोपी नारायण याने गर्भ मोढ्याच्या जागेत पुरल्याचे मान्य केले.
बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांसाठी विशिष्ट कोडवर्ड !
बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांसाठी चिकित्सालयात येण्यासाठी एका विशिष्ट ‘कोडवर्ड’चा वापर करण्यात येत होता. महिला रुग्णांना घेण्यासाठी जळगाव रस्त्यावरील सेना भवनजवळील एका उपाहारगृहात रुग्णालयाचा कर्मचारी जात होता. महिला संबंधित कर्मचार्याला ‘बचत गटाच्या मिटिंगसाठी जायचे आहे,’ असे सांगायच्या. या कोडवर्ड सांगणार्या महिलांची निश्चिती पटल्यानंतर तो कर्मचारी महिलांना श्री रुग्णालयात घेऊन जात असे.
संपादकीय भूमिका :
|