साधकांनो, उद्याचा दिवस आपल्या हातात नसल्याने आजची साधना आजच करा !

पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे अनमोल विचारधन !

(पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर

‘अनेक साधकांचे म्हणणे असते, ‘‘मी साधना वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो; पण ते सफल होत नाहीत.’’ अनेक वर्षे साधना करणारा साधकही हेच म्हणतो, तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटते. माझे मन अंतर्मुख होते. त्या साधकांसाठी माझी ईश्वरचरणी प्रार्थनाही होते. अशा वेळी माझ्या लक्षात येते, ‘प्रयत्न करतो. प्रयत्न करतो’, असे न म्हणता साधकांनी मनाशी ठाम निश्चय करावा.’ आपण सकाळी उठतो आणि आपल्या नियोजनाप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करतो; परंतु काही वेळा आयत्या वेळी अन्य सेवा आल्यास साधनेची ठरवलेली वेळ निघून जाते. तेव्हा मनात विचार येतात, ‘आता राहू दे. दुपारी बघूया.’ साधकाची दुपारीही तीच स्थिती होते. साधकाला वाटते, ‘आता मी पुष्कळ थकलो आहे. संध्याकाळी नक्कीच करूया.’ असे म्हणता म्हणता संध्याकाळही निघून जाते आणि रात्र होते. साधकाला ठरवलेल्या ध्येयाची आठवण होते. तेव्हा दिवसभरात फार अल्प प्रमाणात साधना झाल्याचे त्याच्या लक्षात येते. तेव्हा तो पुन्हा आरंभ करण्याचे ठरवतो; पण ‘निद्रादेवी साधकाला कधी स्वतःच्या नियंत्रणात घेते’, हे त्याला कळतच नाही. नंतर नाईलाजास्तव तो म्हणतो, ‘आता राहू दे. उद्या पाहू.’ मला साधकांना सांगावेसे वाटते, ‘उद्या कधी येतो का ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘उद्याचा दिवस पुन्हा वर्तमान दिवसच होतो. त्यामुळे हा उद्याचा दिवस कधीच आपल्या हाती येत नसतो; म्हणून उद्या नको, तर आजच आणि आताच साधनेला आरंभ करूया.’’

‘साधक म्हणतात, ‘‘प्रयत्न करतो’’; पण हा प्रयत्न, म्हणजे लगाम नसलेल्या वारूसारखा (घोड्यासारखा), जो आपल्याला कुठे भरकटत नेईल, ते सांगता येत नाही; म्हणून आपण मनःपूर्वक गुरुमाऊलींचे स्मरण करून निश्चय करूया. मग प्रयत्नांचा ‘वारू’ नव्हे, तर निश्चितच निश्चयाचा मेरू आपल्याला उत्तुंग यशाच्या शिखरावर पोचवेल’, असे मला वाटते. प्रयत्न अपूर्ण आहेत आणि निश्चय परिपूर्ण आहे.’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर (सनातनचे ४० वे संत, वय ८४ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल.