गोव्यात यंदापासून इयत्ता ९ वीसाठी लागू होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण !

  • आढावा बैठकीत शिक्कामोर्तब 

  • ३ विषय नव्याने लागू होणार

पणजी, १७ मे (वार्ता.) – यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट महिन्यापासून इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एन्.ई.पी.ची) कार्यवाही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे मंत्रालयात १७ मे या दिवशी याविषयी एक आढावा बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक शैलेश झिंगडे आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

याविषयी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘इयत्ता ९ वीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करतांना ‘व्होकेशनल स्टडिज’ (व्यावसायिक अभ्यासक्रम), ‘इंटर डिसिप्लिनरी’ आणि ‘आर्ट’ (कला) हे ३ विषय नव्याने लागू करण्यात येणार आहेत. धोरण लागू केल्यानंतर कदाचित् पहिले २ मास हे विषय शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतील; मात्र ऑगस्ट महिन्यापासून हे विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे या नवीन ३ विषयांवरील अभ्यासक्रम ऑगस्टपासूनच शिकवला जाणार आहे. ‘इंटर डिसिप्लिनरी’ विषयासाठी अभ्यासक्रम सिद्ध करून तो सर्व शाळांना देण्यात येणार आहे. विद्यालयांमध्ये १८० शिक्षकांची भरती प्रक्रिया जलद गतीने करण्यात येणार आहे.’’