मुंबई, १७ मे (वार्ता.) – मतदान केंद्राच्या ठिकाणी भ्रमणभाष नेण्यावरून राज्यात काही ठिकाणी वादाचे प्रसंग ओढवले. या पार्श्वभूमीवर यापुढील लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या १०० मीटरपर्यंत भ्रमणभाष नेण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. भ्रमणभाष बंद करूनही मतदान यंत्राच्या ठिकाणी नेण्यास अनुमती असणार नाही, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी १७ मे या दिवशी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भ्रमणभाष घेऊन येणार्यांसाठी टोकन देऊन मतदान केंद्राच्या बाहेर भ्रमणभाष ठेवण्याची व्यवस्था करण्याचा विचार आम्ही करत आहोत. याविषयीचा निर्णय लवकरच घोषित करण्यात येईल. मतदान करण्यासाठी गेल्यावर काही जणांचे नाव मतदारसूचीत नसल्याचे प्रकार घडले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी ५ व्या टप्प्यातील मतदारांचे ८० टक्के टोकन (स्लीप) वितरीत करण्यात आले आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमवेत आम्ही बैठक घेतली आहे. मतदारांना मतदारसूचीत नाव सापडत नसल्यास १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून साहाय्य घेता येईल, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले. रुग्णाईतांना मतदान करता यावे, याविषयी निवडणूक आयोगाकडून काही व्यवस्था करण्यात येणार आहे का ? याविषयी पत्रकारांनी विचारले असता, रुग्णाईत असतांना व्यक्तीचे मानसिक संतुलन ठीक असेलच असे नाही. तिची प्रकृती मतदान करण्यासाठी व्यवस्थित आहे कि नाही, याचाही अभ्यास करणे आवश्यक ठरेल. त्यामुळे याविषयी केंद्रीय निवडणूक आयोग योग्य तो विचार करेल, असे त्यांनी सांगितले.
मतदान करतांना व्हिडिओ प्रसारित करणार्यांवर गुन्हा नोंद !
मतदान करतांना व्हिडिओ प्रसारित करणार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. याविषयीची आकडेवारी लवकरच घोषित करण्यात येईल, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.