इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – भारतीय आयुर्वेद पद्धतीमध्ये प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा विचार करून जीवन जगण्याची पद्धती निर्माण केली आहे. भारतीयत्व जोपर्यंत आपल्या अंगात भिनत नाही, तोपर्यंत आपल्याला संपूर्ण आरोग्य मिळणार नाही. आपला आहार योग्य असेल, तर आहार हेच औषध आहे. वेगळ्या जीवनसत्त्वांची आपणास आवश्यकता भासणार नाही, असे मार्गदर्शन प्रसिद्ध आयुर्वेदतज्ञ वैद्य सुविनय दामले यांनी केले. येथील मनोरंजन मंडळ, ‘श्री दगडूलाल मर्दा फाऊंडेशन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ‘सुटणार्या पोटातून कसं सुटायचं ?’ या विषयावर ते बोलत होते.
वैद्य दामले पुढे म्हणाले, ‘‘ज्यांचे पोट वाढले आहे अशी माणसे म्हणतात की, पोट अल्प करायचे आहे; पण पोटाचा आकार न्यून करण्याचा वजनाशी अधिक संबंध नाही. आपल्याला पोटाचा आकार अल्प करण्यासाठी चरबी न्यून केली पाहिजे. अधिक प्रमाणात वजन न्यून केले, तर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. आहार आणि व्यायाम यांचा विचार करायला हवा. भूक आहे तितकेच खाणे, तहान लागेल तेवढेच पाणी पिणे आवश्यक आहे. ज्यादा पाणी प्यायल्याने पोट वाढू शकते.’’ या वेळी उपक्रम समन्वयक श्री. संजय होगाडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर सौ. चित्कला कुलकर्णी यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.